मराठा समाजाच्या धार्मिक उन्नतीसाठी क्षात्रजगदगुरू पीठाची स्थापना.

वेदोक्त प्रकरणादरम्यान खुद्द छत्रपतींना पुरोहितशाहीचा प्रचंड मोठा मनस्ताप सोसावा लागला होता. दस्तुरखुद्द छत्रपतींनाच “शुद्र” संबोधण्यापर्यंत पुरोहितांची मजल गेली होती. आपल्याच तुकड्यावर जगणारे हे धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आपल्यालाच अशी वागणूक देत असतील तर आपल्या सर्वसामान्य मराठा प्रजाजनांची काय अवस्था होत असेल याचा शाहू महाराजांनी पूर्ण विचार केला आणि मराठा समाजाने आपले धार्मिक संस्कार आपल्याच जातीतील पुरोहिताकडून करवून घ्यावेत यासाठी वेदशास्त्रसंपन्न मराठा पुरोहित तयार करण्यासाठी महाराजांनी कोल्हापूरमध्ये “श्री शिवाजी वैदिक विद्यालय” स्थापन केले.

महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर धर्मशास्त्रावरील शंकराचार्य पीठाची मनमानी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी क्षत्रिय मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरु पीठ स्थापन करण्याचाही क्रांतिकारी निर्णय महाराजांनी घेतला. त्यानुसार दि. १२ अॉक्टोबर १९२० रोजी शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु पीठाच्या स्थापनेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात आपण ‘क्षात्रजगदगुरु’ पदाची निर्मिती का करत आहोत, याचे सविस्तर स्पष्टीकरण महाराजांनी दिलेले आहे.

क्षत्रिय मराठ्यांच्या जगदगुरु पदासाठी महाराजांनी सदाशिवराव पाटील बेनाडीकर या तरुण गृहस्थाची निवड केली. बेनाडीकर पाटील हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत व तत्त्वज्ञान विषयाचे शिक्षण घेत होते. त्यांचे वृत्तपत्रांतील अनेक लेखही महाराजांच्या वाचनात आले होते. त्यामुळे समाजहिताची तळमळ असणारा असा तरुण व बुद्धिमान व्यक्तीच क्षात्रजगदगुरु या पदासाठी योग्य ठरेल असा महाराजांना विश्वास होता.

दि. ११ नोव्हेंबर १९२० रोजी पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठात सदाशिवरावांना सशास्त्र पट्टाभिषेक होऊन वैदिक मंत्रांच्या घोषात त्यांना ‘क्षात्रजगदगुरु’ पदावर स्थापन करण्यात आले.

पाटगावच्या मौनी महाराजांचा मठ. याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु पीठाची स्थापना केली. फोटो साभार : विकास भोसले

क्षात्रजगदगुरु पीठाची निर्मिती हा महाराजांचा समाजकारण व धर्मकारणातील एक क्रांतिकारी निर्णय होता. वेदोक्त प्रकरणात महाराजांनी मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले होते, मात्र ब्राह्मणांच्या शंकराचार्य पीठाचे मराठ्यांवरील प्रभुत्व नष्ट झालेले नव्हते. आपल्या धर्माचा जगदगुरु म्हणून मराठ्यांना ब्राह्मण जगदगुरुंकडेच जायला लागत होते आणि ब्राह्मण जगदगुरुंचा सुंभ जळाला तरी पीळ कायम होता. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी प्रकरणात तर स्वतः महाराजांचे हात पोळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मराठ्यांना केवळ ब्राह्मण पुरोहितच नव्हे तर ब्राह्मण जगदगुरुच्याही धार्मिक जोखडातून मुक्त करण्यासाठी छत्रपतींनी मराठा पुरोहीत व मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरु पीठ निर्माण केले. मराठ्यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीने छत्रपतींचा हा निर्णय ऐतिहासिक व प्रचंड महत्त्वपूर्ण ठरला.

आपल्या सरदारांनी व मराठा प्रजाजनांनी आपले धार्मिक संस्कार हे क्षात्रजगदगुरु पीठाच्या मराठा पुरोहितांकडूनच करवून घ्यावेत अशी आज्ञा दिली. छत्रपतींच्या या आज्ञेचे अनेकांनी पालन केले. छत्रपती घराण्यातील धार्मिक विधीदेखील मराठा पुरोहितच पार पाडू लागले. शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक क्षात्रजगदगुरुंनीच पार पाडला. मराठा पुरोहिताकडून राज्याभिषेक होणारे राजाराम महाराज हे पहिलेच राजे. राजाराम महाराजांनंतर १९४७ साली शहाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील क्षात्रजगदगुरु व मराठा पुरोहितांनीच पार पाडला. आजही कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे सर्व धार्मिक विधी हे मराठा पुरोहितच पार पाडतात.

धर्मशास्त्राचा प्रमुख हा राजा असतो. राजा सांगेल तो धर्म, हे छत्रपती शाहू महाराजांनी ‘क्षात्रजगदगुरु पीठ’ स्थापन करुन पुन्हा एकदा सिद्ध केले.

Post By : © Karvir Riyasat Facebook Page

दि. ११ नोव्हेंबर १९२० रोजी सदाशिवराव पाटील यांना पट्टाभिषेक होऊन ते क्षात्रजगदगुरु पदी विराजमान झाले त्याप्रसंगीचे दुर्मिळ छायाचित्र.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक ‘शिवाजी पूल’

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक ‘शिवाजी पूल’

२३ अॉक्टोबर १८७१ रोजी कोल्हापूरच्या राजगादीवर अभिषिक्त झालेले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना इतिहास ‘चौथे शिवाजी’ या नावाने ओळखतो, कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवर बसणारे ‘शिवाजी’ या नावाचे ते चौथे राजे होते.

चौथे शिवाजी महाराज यांची कारकिर्द सन १८७१ ते १८८३ अशी राहिली. महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर शहर व राज्यात काही नवीन व लोकोपयोगी बांधकामे करण्यात आली. कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल व पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पूल हा याच छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या काळात बांधण्यात आला.

श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज

वाहतूक व दळणवळणाच्या सोयीसाठी कोल्हापूर दरबारने पंचगंगा नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या बांधकामास सन १८७४ साली सुरूवात झाली. या कामावर आर्किटेक्ट म्हणून छत्रपतींच्या दरबाराने मेजर वॉल्टर डकेट यांची नेमणूक केली होती, तर बांधकामाचे कंत्राट ‘मेसर्स रामचंद्र महादेव अँड कंपनी’ यांना दिले होते. पूल बांधण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च हा छत्रपतींच्या दरबारातून करण्यात आलेला होता. सन १८७८ साली पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला झाला.

कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ, पुलाला ‘शिवाजी पूल’ असे नाव तेव्हाच देण्यात आले (छत्रपती शिवाजी महाराज पूल असे नव्हे !).

शिवाजी पूल बांधण्याचा निर्णय छत्रपतींच्या दरबारने घेतला, पूल बांधलाही दरबारने, पैसाही दरबारचाच वापरला. पण आज कित्येक लोक हा पूल इंग्रजांनी बांधला असे बेधडक ठोकून देतात. कोल्हापूरातील माध्यमांचे प्रतिनिधी देखील या पुलाचा उल्लेख ‘ब्रिटीशकालीन पूल’ असा करत याचे श्रेय ब्रिटिशांना देऊन मोकळे होतात. एखाद्या इमारतीच्या बांधकामाचा काळ सांगताना ती इमारत ज्या राज्यकर्त्यांच्या काळात बांधून झाली, त्यांच्या नावाने सांगितला जातो. कोल्हापूरचे राज्यकर्ते हे सन १९४९ पर्यंत छत्रपती महाराज होते, मग यात ब्रिटिश कुठून आले ? ते बांधकामासाठी पगारावर ठेवले म्हणून पूल लगेच ब्रिटिशकालीन होत नाही. अशात कुणी सांगत असेल की त्यावेळी देशभरात ब्रिटीशांची सत्ता होती, म्हणून पूल ब्रिटिशकालीन ! तर असेही होऊ शकत नाही, नाहीतर उद्या हेच लोक त्याकाळी देशभरात मुघलांची सत्ता होती म्हणून शिवरायांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंना मुघलकालीन वास्तू म्हणायला लागतील ! याबाबतीत कोल्हापूरकरांनी, माध्यम प्रतिनिधींनी गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. शेवटी आपला इतिहास हा आपल्यालाच जपावा लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले लोकाभिमुख स्मारक

दि. १० नोव्हेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्याची दिल्ली येथे घोषणा केली. शिवरायांचे हे स्मारक म्हणजे महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याबरोबरच महाराजांच्या नावाने एक असे होस्टेल सुरु करणे ज्यामध्ये शंभर मराठा विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होईल, अशी योजनाही शाहू महाराजांनी जाहीर केली. केवळ इतकेच नव्हे तर शिवछत्रपती महाराजांच्या या स्मारकाच्या माध्यमातून देशभरातील मराठ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक धोरणांचे प्रमुख केंद्र महाराजांना स्थापन करावयाचे होते. छत्रपती शाहू महाराजांनी आपली ही योजना सर्व मराठा राजांना पत्राद्वारे कळविली. शिवस्मारकाच्या पुढील कामांसाठी महाराजांनी खासेराव जाधव या गृहस्थांची नेमणूक केली. नोव्हेंबर १९१७ च्या अखेरीस खासेराव जाधवांनी पुण्यातील जागा वगैरे पाहून महाराजांपुढे शिवस्मारकाचे अंदाजपत्रक ठेवले. या अंदाजपत्रकानुसार शिवस्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च येणार होता. महाराजांनी पुण्यामधील भांबुर्डा या गावी साडे सात एकर जमीन एक लाख रुपयांना विकत घेतली. या जागेवर शिवस्मारकाचे बांधकाम सुरु करण्यासाठी पायाभरणी समारंभास दस्तुरखुद्द ब्रिटिश युवराजांनाच आमंत्रित करण्याचे छत्रपतींनी ठरविले. ज्या ब्रिटिशांनी शिवरायांना लुटारु ठरवले, शिवरायांचे गडकोट पाहून मराठ्यांना परत लढण्याची प्रेरणा मिळू नये म्हणून ज्या ब्रिटीशांनी अनेक गडकोट उध्वस्त केले, त्याच ब्रिटिशांच्या भावी राजाच्या हातून शिवरायांच्या स्मारकाची पायाभरणी करण्याचा चंग महाराजांनी बांधला होता.

दि. १९ नोव्हेंबर १९२१ रोजी शिवरायांच्या स्मारकाचा कोनशिला अनावरण तथा पायाभरणी समारंभ छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत व प्रिन्स अॉफ वेल्सच्या हस्ते पार पडला. यावेळी मराठा राजे, सरदार जहागीरदार व हजारो लोक उपस्थित होते. छत्रपती शिवराय व छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून निघत होता. प्रिन्स अॉफ वेल्सचाही जयजयकार होत होता.

प्रिन्स अॉफ वेल्स व श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताना…

याप्रसंगी प्रिन्सला संबोधित करताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, “आपण हि गर्दी व लोकांचा उत्साह पाहून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठा लोकांत किती आदर आहे याची कल्पना करु शकता. शिवाजी महाराज हे राजनीतीकुशल होते. आठ मंत्र्यांचे मंत्रीमंडळ स्थापन करुन महाराजांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची संकल्पना भारतात राबवली. याशिवाय सर्वप्रथम भारतीय आरमार स्थापन करणारेही शिवाजी महाराजच होते. मला खात्री आहे की सन्माननीय प्रिन्स हे शिवाजी महाराजांची ताकद व राजनीतीकौशल्य ओळखण्यास कमी पडणार नाहीत. सन्माननीय प्रिन्स यांना ठाऊकच आहे की मराठा हि जात जन्मापासूनच शूर आहे आणि आजदेखील कलकत्ता शहराभोवतीचा ‘मराठा खंदक’ आमच्या ताकदीची साक्ष देत आहे.” पुढे बोलताना महाराज म्हणाले, “मराठा हा स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आज याठिकाणी उभा आहे. मराठ्यांची हि ताकद ओळखून ब्रिटीश साम्राज्यानेही मराठा समाजास सैन्यामध्ये योग्य जागा दिलेली आहे. आता आमच्यावर हि जबाबदारी आहे की आम्ही शिक्षणाचादेखील पूरेपूर फायदा घेतला पाहिजे. योग्य शिक्षण हा आमचादेखील जन्मजात हक्क आहे. रणमैदानात आम्ही स्वतःला सिद्ध केलेच आहे, आता आम्हाला प्रशासनातही पाय रोवून उभे रहायचे आहे. आम्हाला केवळ आमच्या तलवारीचीच नव्हे तर आमच्या लेखणीचीही ताकद दाखवून द्यायची आहे (not only our swords but our pen).”

प्रिन्स अॉफ वेल्स समोर महाराजांनी अत्यंत परखड भाषण केल्यामुळे उपस्थित जनसमुदायालाही स्फूरण चढले. शिवराय व शाहू महाराजांचा जयजयकार झाला.

यानंतर बोलताना प्रिन्स अॉफ वेल्स म्हणाला, “शिवाजी महाराजांनी केवळ साम्राज्यच उभारले नाही तर एक राष्ट्र घडवले.” किती महत्त्वपूर्ण आहे हे वाक्य ! शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी ब्रिटिश युवराजाला बोलाविण्याच्या महाराजांचा उद्देशच इथे पूर्णपणे साध्य झाला. ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांना लुटारु ठरवले त्याच इंग्रजांच्या राजाला शिवाजी महाराजांचे कर्तृत्व मान्य करुन महाराजांना ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून गौरवण्यासाठी शिवाजी महाराजांच्याच वंशजाने भाग पाडले, हा केवळ योगायोग निश्चितच नव्हता. हि शिवप्रभूंनी आपल्या वंशजास दिलेली ताकद होती.

पुढे बोलताना प्रिन्सने शाहू महाराजांच्या शिवस्मारकाच्या योजनेचेही कौतुक केले. दुसऱ्याच दिवशी ‘टाईम्स अॉफ इंडिया’च्या मुखपृष्ठावर प्रिन्सच्या “Shivaji not only founded an Empire but created a Nation” या उद्गारांच्या हेडलाईनसह सविस्तर बातमी प्रकाशित झाली.

अर्ध्या जगावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांच्या या राजाला छत्रपती शिवरायांसमोर झुकावे लागले आणि अशाप्रकारे ब्रिटिश युवराज ‘प्रिन्स अॉफ वेल्स’ च्या हस्ते शिवरायांच्या जगातील पहिल्या लोकाभिमुख स्मारकाची पायाभरणी पार पडली. शाहू महाराजांचे जीवितकार्य प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली. पुढे या शिवस्मारकाचे बांधकाम व पुढील कारभार सांभाळण्यासाठी ‘अॉल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ची (AISSMS) स्थापना करण्यात आली व छत्रपती महाराज या सोसायटीचे सर्वेसर्वा म्हणून शिवस्मारकाचे काम स्वतः जातीने पाहू लागले. शाहू महाराजांनंतर त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले. अनेक मराठा विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबरच राहण्या खाण्याचीही योग्य सोय होऊ लागली. शाहू महाराजांचे नातू छत्रपती शहाजी महाराज व पणतू कोल्हापूरचे सध्याचे छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे व महाराजकुमार मालोजीराजे यांनी शिवस्मारकाच्या शैक्षणिक कार्याचा प्रचंड विस्तार करुन शाहू महाराजांचे स्वप्न एका वेगळ्या उंचीवर नेऊन सत्यात उतरवले आहे.

आज शिवस्मारकाची ऐतिहासिक पायाभरणी होऊन ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. याबद्दल आपले स्फूर्तीस्थान, दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन तर करुयाच पण त्याचबरोबर यानिमित्त छत्रपती शाहू महाराजांनी दाखविलेल्या राजकीय मुत्सद्दीपणाचेही स्मरण करुन त्यापासून प्रेरणा घेऊया…

Post By : ©Karvir Riyasat Facebook Page

छत्रपती संभाजीराजे… ‘एक राजा माणूस’ (भाग ३)

मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंना मानणारा तरुणांचा मोठा वर्ग तयार झालेला आहे. संभाजीराजे महाराष्ट्रातील तरुणांचे नेतृत्व म्हणून उदयास आले हे आपण मागील भागात पाहिले. मराठ्यांना मिळालेले आरक्षण न्यायालयाने स्थगित केल्यामुळे तो सध्या न्यायप्रविष्ट भाग आहे. आरक्षण परत मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई तूर्तास संपली होती. पण यानंतरही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संभाजीराजेंचे महाराष्ट्रभरात दौरे सुरुच राहिले. गडकोटांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंनी प्रयत्न सुरु केले. संभाजीराजेंच्या प्रयत्नांतून रायगडावर दरवर्षी पार पडत असलेल्या शिवराज्याभिषेक महोत्सवाने गर्दीचे उच्चांक मोडले. राजेंच्या मागे उभा असलेला जनतेचा मोठा वर्ग पाहता व राजेंचे सामाजिक कार्य पाहता राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान मोदींच्या शिफारशीने संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती केली. संभाजीराजेंच्या अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले. संभाजीराजेंच्या नियुक्तीचे समाजातून संमिश्र पडसाद उमटले. पण संभाजीराजेंच्या खासदारकीचे स्वागत करणाऱ्यांची संख्या अधिक होती. संभाजीराजेंनी आजपर्यंत चळवळीच्या माध्यमातून लढा दिला होता. पण चळवळी व आंदोलने करुन फारसे काही पदरात पडत नाही, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी हातात सत्ता हवी हे त्रिवार सत्य संभाजीराजेंना उमगले असावे आणि कदाचित यामुळेच संभाजीराजेंनी राज्यसभा सदस्यत्व स्वीकारले असे म्हणावयास वाव आहे. कारण राज्यसभा सदस्यत्व स्वीकारल्यानंतरची त्यांची कारकीर्द पाहता त्यांनी खासदारकीचा वापर केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठीच केलेला दिसून येतो. ते खासदार झाल्यानंतर महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या पण कोणत्याही निवडणूकीत ते सक्रीय झाले नाहीत. संभाजीराजे भाजपाचा प्रचार करतील असा भल्याभल्यांचा अंदाज त्यांनी धुळीस मिळवला. त्यांनी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा प्रचारही केला नाही व कोणत्या उमेदवारास पाठींबाही दिला नाही. पक्षीय राजकारणापासून ते पूर्णतः अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान संभाजीराजेंची खासदारकी एका वेगळ्याच कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक दिवस चर्चेत राहिली. ते कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंच्या खासदारकीवर दिलेली प्रतिक्रिया. खासदार झाल्याबद्दल संभाजीराजेंचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः पवारसाहेब कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राजवाड्यात गेले. वाड्यावरही पवारांचा यथोचित पाहुणचार करण्यात आला. यावेळी पवारांना शाही मेजवानी देण्यात आली. वाड्यावरील पाहुणचार स्वीकारल्यानंतर कोल्हापूरात पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंच्या खासदारकीवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि राजेंच्या खासदारकीच्या चर्चा यानंतर महिनाभर वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मिडीया आदी माध्यमांवर रंगू लागल्या.

पवारांच्या वक्तव्यामुळे संभाजीराजेंच्या खासदारकीचा राज्यभर गवगवा झाला. यापूर्वी एखाद्याच्या खासदारकीची एवढी चर्चा व प्रसिद्धी क्वचितच झाली असेल. विशेष म्हणजे पवारांनी वाड्यावरुन आल्यानंतर असे वक्तव्य केले होते त्यामुळे पवारांचे वक्तव्य हे “वाड्यावरचीच मसलत” असल्याचे कोल्हापूरात बोलले गेले. खरे खोटे स्वतः पवार व छत्रपतीच जाणोत !

राजे खासदार झाल्यानंतर काही दिवसांनी कोपर्डी येथे एक अमानुष घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ लाखोंच्या संख्येने मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र आला. याचवेळी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरु झाले. संभाजीराजे प्रथमच खासदार म्हणून संसद अधिवेशनास उपस्थित राहणार होते आणि या पहिल्याच अधिवेशनात कोपर्डीच्या घटनेविषयी संसदेत आवाज उठवून संभाजीराजेंनी आपल्या संसदीय कारकीर्दीस प्रारंभ केला. भाजपबरोबर जाऊन संभाजीराजेंनी मराठा समाजाचा विश्वासघात केला अशी टिकाही संभाजीराजेंवर झाली होती. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणारे संभाजीराजे हेच पहिले खासदार आहेत हि बाब लक्षात घेतली पाहिजे.

‘खासदार’ म्हणून संभाजीराजेंच्या प्रगतीचा आलेख हा चढताच आहे. संभाजीराजेंची संसदेतील उपस्थिती हि सर्वाधिक म्हणजेच १००% इतकी आहे. संभाजीराजेंनी वेगवेगळ्या विषयावरील एकूण १६६ हून अधिक प्रश्न संसदेत उपस्थित केले आहेत. याशिवाय कोल्हापूरातील इतर दोन खासदारांच्या तुलनेत संभाजीराजेंनी दत्तक घेतलेल्या ‘येळवण जुगाई’ या गावाची प्रगती वेगाने होत आहे.

‘छत्रपती’ म्हणून संभाजीराजेंना कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वीपासूनच मान सन्मान होता. पण २००९ च्या पराभवानंतर राजे जिल्ह्याच्या राजकारणातून स्वतःच बाजूला झाले होते. त्यांचे बंधू माजी आमदार मालोजीराजे हेदेखील सक्रीय राजकारणातून पूर्णतः बाजूला होऊन पुण्यातील शिक्षणसंस्थांचा कारभार सांभाळत आहेत. मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजे या कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते माजी मंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांचा प्रचंड जनसंपर्क व जनमान्यता आहे. त्यांच्या रुपाने छत्रपती घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात येणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत संभाजीराजेंनी रिंगणात उतरावे अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे. भविष्यात काय होईल हे येणारा काळच सांगेल. आतापर्यंतच्या तीन भागांमधून आपण संभाजीराजेंच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. संभाजीराजे हे राजघराण्याचे सदस्य आहेत, त्यातूनही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल सतत उत्सुकता असते. आपल्या राजेंचे दैनंदिन आयुष्य कसे असेल, राजेंचा स्वभाव कसा असेल इथंपासून ते राजघराण्याची संपत्ती किती असेल इथंपर्यंत जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्सुकता असते. संभाजीराजेंबद्दल या बाबींचाही आपण आढावा घेणार आहोत, पण या लेखमालेच्या पुढील भागात…..

हि लेखमाला आपल्याला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.

लेखमालेचे इतर भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ (भाग १)

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग दुसरा (मराठा आरक्षणाचा लढा)

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग २ (मराठा आरक्षण लढा)

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत पराभवास सामोरे जावे लागल्यानंतरही खचून न जाता संभाजीराजे अधिक जोमाने काम करु लागले. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “२००९ च्या पराभवानंतर माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर राजवाड्यात परतून ऐषोआरामाचे जीवन जगायचे किंवा जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायचे. मी दुसरा पर्याय निवडला.” निवडणूक निकालानंतर काहीच दिवसांत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होता. दरवर्षीप्रमाणे याही सोहळ्यास राजे उपस्थित राहिले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराभवानंतर संभाजीराजे कोल्हापूरातून बाहेर पडले व मराठा आरक्षणाबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

पण संभाजीराजे थेट राज्यपातळीवर जाणे हि त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणातून शोधलेली पळवाट आहे, असे काही बड्या राजकीय तज्ञांनी विश्लेषण केले. पण खरं सांगायचं तर संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांनी केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित राहणे हेच अयोग्य ठरले असते. राजेशाही संपुष्टात येऊन भारताने लोकशाहीचा जरी अंगिकार केला असला तरी सातारा व कोल्हापूर या दोन राजघराण्यांप्रती महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेले नितांत प्रेम, आदर व अपेक्षा तिळमात्रही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी संभाजीराजे पुढे सरसावले हे त्यांच्या घराण्याच्या वारशास शोभणारेच पाऊल होते.

काही वर्षांपूर्वी बहुतांश मराठा समाजात आरक्षणाबद्दल प्रतिकूल मानसिकता होती. आम्ही उच्चकुलीन, सरदार – सरंजामदार जातीवंत मराठे आणि आम्ही आरक्षण घेऊन स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घ्यायचे का ? आरक्षणाच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही, अशी नकारात्मक लोकभावना मराठा समाजात रुजलेली होती. पण यामुळे समाजातील गरीब घटकांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात होत असलेले अतोनात नुकसान, कुचंबणा याकडे कुणाचेही लक्ष नव्हते अथवा प्रतिष्ठेपायी याकडे दुर्लक्ष केले जायचे. ज्या संघटना आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत होत्या त्यांच्यामध्येही एकी नव्हती. आरक्षणाच्या लढ्याला एकसंधपणा नव्हता. यावेळी संभाजीराजे छत्रपती या लढ्यात उतरले. मराठ्यांच्या सर्व संघटनांना त्यांनी एका छत्राखाली आणले. या संघटनांनी आरक्षण लढ्याचे नेतृत्व राजेंकडे सोपवले. संभाजीराजेंनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले व ठिकठिकाणी सभा घेऊन आरक्षणाबद्दल मराठा समाजात जनजागृती केली.

संभाजीराजेंच्या प्रत्येक सभेस हजारो लोकांची गर्दी उसळायची. “पूर्वी आपण मोठे सरंजामदार, जमीनदार होतो. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आपापसांत वाटण्या होऊन आज शंभर एकराचे शंभर तुकडे झालेले आहेत. समाजावर आर्थिक दारिद्रय ओढवलेले आहे. गुणवत्ता असूनही आपल्या मुलांना हवे ते शिक्षण मिळत नाही. मराठ्यांनो, हि परिस्थिती बदलायची असेल तर रम्य भूतकाळ विसरा आणि ओबीसींमध्ये स्वतःची गणना करा. अभिमानास थोडा धक्का बसेल पण आपल्या गरीब बांधवांना शिक्षणात फायदा होईल,” असे स्पष्ट शब्दांत प्रत्येक सभेत संभाजीराजेंनी ठणकावून सांगितले.

शाहू महाराजांनी मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे कोल्हापूर संस्थानात मराठ्यांची सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात झालेली उन्नती समजावून देत आरक्षणाचे महत्व व आज मराठा समाजास असलेली आरक्षणाची गरज समाजाच्या मनावर बिंबवली.

शिवशाहू रथयात्रेदरम्यान संभाजीराजेंच्या वाहनांचा ताफा…

शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून आरक्षणाबद्दल समाजाचे मतपरिवर्तन घडवून आणून संभाजीराजेंनी ४ एप्रिल २०१३ रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे एक लाख मराठ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढला. यामध्ये ८४ हून अधिक मराठा संघटना सामील झाल्या होत्या व या मोर्चाचे सामूहिक नेतृत्व संभाजीराजेंकडे देण्यात आले होते.

गेल्या दोन-अडीचशे वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकदिलाने एकत्रित येण्याची हि पहिलीच वेळ होती, तेदेखील खुद्द छत्रपतींच्या नेतृत्वाखाली ! त्यामुळे “अशक्य ते शक्य कारण छत्रपतींचे नेतृत्व” असे या मोर्चाचे वर्णन सर्व स्तरांतून करण्यात आले.

मराठा समाजाची खरी ताकद व एकजूट दाखवून देण्यामध्ये संभाजीराजे यशस्वी झाले. या मोर्चामुळे राज्यसरकारला मराठा आरक्षणाविषयी गांभिर्याने विचार करणे भाग पडले व पुढच्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केले.

मराठा समाजाच्या लढ्याला यश आल्याचे दिसू लागले पण ते केवळ एक मृगजळ ठरले. न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सत्तापालटही झाला. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार उदयास आले. यानंतर संभाजीराजेंच्या कारकीर्दीची दिशा काय राहिली हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत…

संभाजीराजेंच्या कारकिर्दीवरील या लेखमालेचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग पहिला

हा भाग आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. मराठा आरक्षण लढा – शिवशाहू रथयात्रेदरम्यानची आणखी काही क्षणचित्रे…

मुंबई येथील विशाल मराठा मोर्चाचे नेतृत्व करताना संभाजीराजे…

छत्रपती संभाजीराजे… “एक राजा माणूस” (भाग १)

गेल्या आठ-दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. त्याचबरोबर अनेक युवा नेतृत्वांचाही उदय झाला. यामध्ये जनतेचे प्रचंड पाठबळ व लोकप्रियता लाभलेले नेतृत्व म्हणून कोल्हापूरचे युवराज व शिवरायांचे तेरावे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव ठळकपणे अधोरेखित होते. संभाजीराजेंच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. राजेंच्या लोकप्रियतेमागे व महाराष्ट्रातील तरुणांनी त्यांचे नेतृत्व उचलून धरण्यामागे, ते छत्रपतींचे वंशज आहेत हि सर्वांत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे सर्वप्रथम संभाजीराजेंच्या घराण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याचे त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या निधनानंतर विभाजन झाले व छत्रपतींच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती व सातारचे छत्रपती. या पैकी सातारची गादी दत्तक वारस नामंजूर करुन इंग्रजांनी इ.स. १८४८ साली खालसा केली व आपल्या साम्राज्यात सामील करुन घेतली. पण कोल्हापूरच्या छत्रपतींची गादी ब्रिटिशांना खालसा करता आली नाही. याच कोल्हापूर गादीचे संभाजीराजे हे वारसदार असून ते शिवरायांचे थेट तेरावे वंशज आहेत. ब्रिटिश काळातही कोल्हापूरचे छत्रपती स्वतंत्र राहिले. इतकेच नव्हे तर १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कोल्हापूरच्या छत्रपतींचे राज्य हे एक स्वतंत्र राज्य होते. पण इ. स. १९४९ साली छत्रपती शहाजी महाराज (राजर्षि शाहू महाराजांचे नातू व संभाजीराजेंचे आजोबा) यांनी कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन केले. विलीनीकरणानंतर छत्रपतींच्या हातून काही विशेष अधिकार वगळता संपूर्ण राजसत्ता निघून गेली. इतरांप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे सर्वसामान्य नागरिक झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राजघराणी राजकारणात सक्रीय झाली. मात्र कोल्हापूरचे राजघराणे यास अपवाद ठरले. छत्रपती शहाजी महाराज हे राजकारणाऐवजी इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये उतरले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. अर्थातच जोडीला समाजकारण सुरुच होते पण ते राजकारणात मात्र सक्रीय झाले नाहीत.

राजर्षि शाहू महाराजांचे नातू व युवराज संभाजीराजेंचे आजोबा मेजर जनरल श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संसदेत जाणाऱ्या पहिल्या सदस्या म्हणजे राजमाता विजयमाला राणीसरकार. १९६७ साली भारताचे माजी उपलष्करप्रमुख जनरल एस. पी. पी. थोरात यांचा पराभव करुन विजयामाला राणीसरकार या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यांच्यानंतर संभाजीराजेंचे वडील कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज हेदेखील समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. त्यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे हे २००४ साली कोल्हापूर शहरातून वयाच्या २७ व्या वर्षीच आमदार म्हणून निवडून आले होते.

२००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर संभाजीराजे लोकसभा निवडणूकीस उभे राहिले, पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव संभाजीराजेंच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

या पराभवाचे विश्लेषण अनेक दृष्टिकोनांतून करता येईल पण त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वापार चालत आलेले पाडापाडीचे राजकारण. संभाजीराजे त्यावेळी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होती. असे झाले असते तर स्वतंत्र भारताच्या संसदीय व राजकीय इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना ठरली असती. संभाजीराजे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाच होता, पण असे घडणार नव्हते. किंबहुना संभाजीराजेंच्याच पक्षातील कोल्हापूर जिल्ह्याच्या ‘कारभाऱ्यांना’ तसे घडून द्यायचे नव्हते. कारण यामुळे छत्रपतींचे वारस म्हणून आधीच लोकप्रिय असलेल्या संभाजीराजेंचे राजकीय महत्त्व अनन्यसाधारण वाढून प्रस्थापित कारभाऱ्यांचे स्थान कायमचे डळमळीत झाले असते. छत्रपती राजकारणात आल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इतर नेत्यांची जी अवस्था झाली ती वेळ स्वतःवर येऊ नये यासाठी कोल्हापूरच्या नेत्यांनी कंबर कसली होती आणि याचे परिणाम म्हणजे संभाजीराजेंच्या विरोधात उभे ठाकले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक. पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या तरुण संभाजीराजेंसमोर अर्धी हयात राजकारणात घालवलेले मुरब्बी राजकारणी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे तगडे आव्हान उभे राहिले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. संभाजीराजेंचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मते हि जवळपास ४ लाख इतकी होती याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

२०१४ साली लोकसभा निवडणूक प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे ‘कारभारी’ असणाऱ्या तत्कालीन मंत्र्याने जाहीर सभेत संभाजीराजेंचा पराभव आपल्यामुळेच झाल्याची कबुली दिली होती.

यामुळे निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात असताना कोल्हापूरात मोठे रणकंदन माजले आणि याचाच धागा पकडत शिवसेनेने ‘ज्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजिर खुपसला त्यांना नेस्तनाबूत करुया’ असे आवाहन करत संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. संभाजीराजेंनी ते निमंत्रण स्वीकारले नाही हा विषय वेगळा, पण या घडामोडींमुळे संभाजीराजे हे लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या छुप्या विरोधामुळेच पराभूत झाले या कोल्हापूरात चाललेल्या चर्चेस दुजोरा मिळून त्यावर शिक्कामोर्तब झाले.

संभाजीराजेंचा पराभव करुन कोल्हापूरातील नेत्यांनी स्वतःचे राजकीय स्थान जरी यशस्वीपणे शाबूत ठेवले तरी पहिल्याच प्रयत्नात आलेले अपयश हे संभाजीराजेंच्या यशाची पहिली पायरी ठरली, हेच पुढे घडलेल्या घटनांवरुन म्हणावे लागेल. राजेंच्या या पराभवानंतर पुढे कोणत्या घटना घडल्या व संभाजीराजेंच्या कारकीर्दीस कशी कलाटणी मिळाली हे पुढील भागात पाहूया….

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा…

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग दुसरा (मराठा आरक्षणाचा लढा)

…आणि बर्चीबहाद्दर बिथरला !

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मालकीचे पूर्वी अनेक हत्ती होते. हे हत्ती किल्ले पन्हाळगड, जुना राजवाडा, नवीन राजवाडा, राधानगरी येथील हत्तीमहाल अशा वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. छत्रपती बुवासाहेब महाराजांनी जुन्या राजवाड्यामध्ये नगारखाना बांधला. तेव्हापासून म्हणजेच सन १८३४ पासून नेहमी राजवाड्याच्या नगारखान्यामध्ये दोन हत्ती असायचे. पैकी ‘बर्चीबहाद्दर’ हा छत्रपतींचा जुन्या राजवाड्यातील शेवटचा हत्ती. १९७० साली बर्चीबहाद्दर निवर्तला व त्यानंतर जुन्या राजवाड्याची ‘गजशोभा’ लोप पावली.

बर्चीबहाद्दरची कारकीर्द जितकी वैभवशाली तितकेच त्याचे अखेरचे दिवस हृदयद्रावक होते. बर्चीबहाद्दरने छत्रपतींचे वैभव पाहिले, नव्हे ! तर तो छत्रपतींच्या वैभवाचाचा एक भाग होता. त्याने शाहू छत्रपती महाराजांसारख्या लोककल्याणकारी नृपतीला आपल्या पाठीवर बसवून मिरवले होते. मौल्यवान आभूषणांनी सजून आपल्या गजगतीने त्याने कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रुबाब आणला होता. आपल्या चित्कारांनी आणि आक्रमकतेने त्याने साठमारीच्या खेळात थरार आणला होता आणि आपल्या मायेने त्याने कोल्हापूरातील अनेक लहानथोरांचे अतोनात प्रेमही मिळवले होते. असा हा बर्चीबहाद्दर म्हणजे छत्रपतींच्या जुन्या राजवाड्याचा एक मौल्यवान अलंकारच होता. भव्य अशा नगारखान्यात उभा असणारा ‘बर्ची’ नगारखान्याच्या भव्यतेत आणखीनच भर घालायचा. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे, राजवाड्यात छत्रपतींना भेटायले येणारे लोक येताना त्यांच्या लाडक्या ‘बर्ची’ साठी आठवणीने काहीतरी खाऊ आणायचे. इवल्याशा खाऊने त्याचे पोट थोडीच भरायचे ! पण मन मात्र खचितच तृप्त व्हायचे ! नवीन राजवाड्यातून येणारे तुपातील रोट व छत्रपतींच्या शेतातील हिरवागार चारा होताच की. याशिवाय दररोज माहूत त्याला फिरायला बाहेर घेऊन जायचा तेव्हा वाटेतील विक्रेते वगैरे लोकही त्याला काहीतरी द्यायचेच. असाच एक काळा दिवस उजाडला. दि. २२ जून १९७०, रोजच्याप्रमाणे माहूत बाबालाल महात याने बर्चीला फिरायला नेण्यासाठी बाहेर काढले. सोबत बाबालालचा नऊ वर्षाचा मुलगा वजीरही होता. दोघेही बर्चीबहाद्दरवर आरुढ झाले व राजवाड्याच्या बाहेर पडले. राजवाड्यातील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलपासून तो मिरजकर तिकटी व बालगोपाल तालमीकडे गेला. तिथून फिरुन राजवाड्याकडे परतत असताना चव्हाण वाड्याजवळ एकाएकी बाबालाल माहूत हत्तीवरुन खाली पडला व जखमी झाला. बाबालाल यावेळी दारु पिऊन हत्तीवर बसला होता, असेही सांगितले जाते. बाबालाल पडल्याची बर्चीबहाद्दरला जाणीवही झाली नाही. पाठीवर बसलेल्या वजीरला घेऊन तो एकटाच राजवाड्यात परतला. माहूताशिवाय एकटाच आलेला बर्चीबहाद्दर पाहून राजवाड्यातील नोकर गोंधळले व हातात भाले घेऊनच त्याच्यासमोर आले. बर्चीबहाद्दरने पूर्वी अनेक साठमाऱ्या खेळल्या होत्या त्यामुळे तो भाले पाहून आपल्या जागी न जाता नगारखान्यातून भावसिंहजी रोडवर गेला. हे पाहून पाच सहा नोकर त्याच्या पुढे जाऊन त्याला हुसकावून मागे वळवण्याच्या प्रयत्न करु लागले. हत्तीच्या पाठीवर लहान मुलगा बसलाय, जवळ माहूत नाही आणि नोकरलोक त्याला रोखतायत हे पाहून काहीतरी वेगळं घडतंय असा लोकांचा गैरसमज झाला व लोकांचा एक मोठा घोळका हुर्यो करत हत्तीपुढे आला. हे पाहून अनेक लोक ओरडाओरडा करत हत्तीच्या भोवती गोंधळ करु लागले. आपल्या अशा वागण्याने आपण ‘साठमारी’चा माहोल तयार करतोय आणि यामुळे बर्चीबहाद्दर जबरदस्त बिथरु शकतो, याचा लोकांनी अजिबात विचार केला नाही. झालेही तसेच, लोकांच्या या अचानक झुंडीमुळे व दंग्यामुळे आतापर्यंत शांतपणे चाललेला बर्चीबहाद्दर बिथरला आणि महाद्वार रोडवर येऊन त्याने टेलिफोनचा खांब सोंडेने वाकवला. हे पाहून अतिउत्साही लोकांनी फारच दंगा सुरु केला. यामुळे बर्चीबहाद्दरने दोन रिक्षा उलथवून टाकल्या. बर्चीबहाद्दर पिसाळला म्हणून लोकांनी दंगा सुरु केला. ‘खरंतर लोकांच्या या अनाठायी फाजीलपणामुळेच तो बिथरला होता.’ बर्चीबहाद्दर पिसाळल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. शहारातील सर्व व्यवहार ठप्प झाले आणि लोकांच्या झुंडी बर्चीबहाद्दरच्या मागेपुढे पळू लागल्या. बर्चीबहाद्दर गंगावेसला आला व त्याने एका गवळ्याची सायकल त्यावर अडकवलेल्या दुधाच्या घागरींसह दूरवर फेकून दिली. तेथून त्याने साकोली कॉर्नरवर येऊन एका ट्रकला जोरदार धडक दिली. हत्तीवर बसलेल्या लहानग्या वजीरची अवस्था दीनवाणी झाली होती. हत्तीच्या गळ्यातील घंटेचा दोर त्याने गच्च पकडून ठेवला होता. शहरातील सर्व पोलिस बंदोबस्तासाठी धावले. वजीरला खाली उतरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. बर्चीबहाद्दर ज्या मार्गाने पुढे जातोय त्या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या इमारतीवर आडवे दोर लावून वजीरला ते पकडण्यास सांगितले जात होते, जेणेकरुन वजीर दोर पकडून राहील व बर्चीबहाद्दर पुढे निघून जाईल. पण वजीरला तो दोर धरण्याचे धाडस होईना. धोतरी तिकटीजवळ तर बर्चीबहाद्दरने आडवा दोरच तोडून दिला. तेथे वजीर हत्तीवरुन खाली पडला व किरकोळ जखमी झाला. 
हत्तीभोवती पळणारी लोकांची झुंड पांगवल्यास हत्तीला काबूत आणणे शक्य होईल असे पोलिसांना वाटले व त्यांनी जोरदार लाठीमार करुन गर्दी पांगवली. मोतीबाग तालमीतील पन्नासभर पैलवानांना घेऊन पोलिसांनी बर्चीबहाद्दरला काबूत आणण्याची योजना आखली. यानुसार त्याच्यापुढे गवत व केळीचे घड टाकत टाकत त्याला गंगावेस, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व भावसिंहजी रोडमार्गे परत जुन्या राजवाड्यात आणले. बर्चीबहाद्दर राजवाड्यात येताच चारी बाजूंनी रोडरोलर, ट्रक व अग्निशामक दलाच्या गाड्या आडव्या लावून तो पुन्हा बाहेर जाऊ नये याची व्यवस्था करण्यात आली. पण सायंकाळी सात वाजता रोडरोलर ढकलून बर्चीबहाद्दर राजवाड्याच्या बाहेर पडला व बिनखांबी गणेश मंदिराच्या दिशेने पळाला. तेथून महाद्वार, कसबा गेट, गंगावेस, शाहू उद्यान, तेली गल्ली व टाऊन हॉलमार्गे जैन बोर्डींगच्या आवारात घुसला. तेथून बाहेर येऊन सत्यवादी भवनासमोर तासभर थांबला. त्याठिकाणी भुसनाळे उडवून त्याला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेटत्या मशाली घेऊन लोक हत्तीच्या मागे धावू लागले. 

काही वर्षांपूर्वी असाच एकदा छत्रपतींचा आवडता हत्ती ‘मदमस्त’ झाल्यामुळे पिसाळला होता. त्या अवस्थेत तो जेव्हा शहराच्या दिशेने येऊ लागला तेव्हा लोकांच्या जिवीतास व वीत्तास मोठा धोका निर्माण झाला. अशावेळी हत्तीस काबूत आणण्याचा तर विचारच करायचा नाही, त्याला थेट जखमी करुन ठाणबद्धच करावे लागते. हत्तीमुळे जेव्हा लोकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी थेट आदेश दिले, “हत्ती जर शहरात घुसून दंगा करु लागला तर त्याला गोळ्या घाला.” त्यावेळी सुदैवाने असे काही करावे लागले नाही कारण हत्ती शहरात घुसण्याआधीच त्याच्यापुढे गवताच्या गंज्या पेटवून त्याला हुसकावण्यात आले व नंतर चिमटे मारुन ठाणबद्ध करण्यात आले. 

आताही अशीच परिस्थिती उद्भवली होती. हत्तीपेक्षा लोकांचा जीव व त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची होती. त्यामुळे बर्चीबहाद्दरला ठाणबद्ध करण्याचे आदेश आले. रात्री साडेदहा वाजता बर्चीबहाद्दरच्या पायात चिमटे मारुन त्याला ठाणबद्ध करण्यात आले. पण तो तसाच संथपणे चालत पुढे जाऊ लागला. अगदी शांतपणे बिंदू चौकमार्गे तो राजवाड्यात आला. पण नगारखान्यातील आपल्या मूळ जागी तो गेला नाही. शहरात रात्री जमावबंदी लागू करण्यात आली. 

बर्चीबहाद्दर बिथरला असतानाचे ऐतिहासिक व दुर्मिळ छायाचित्र… बिथरलेल्या बर्चीबहाद्दरच्या मागे दंगा करत लोक धावत आहेत….

दुसऱ्या दिवशी बाबालाल महात यांना जखमी अवस्थेतच राजवाड्यात आणण्यात आले. त्यांनी व वजीरने बर्चीबहाद्दरला त्याच्या नगारखान्यातील मुख्य जागी नेले व साखळीने जेरबंद केले. 
पूर्वी साठमारीच्या खेळावेळी बर्चीबहाद्दरने अनेकवेळा चिमटे खाल्ले होते. पण चिमटे लावणारे पूर्वीचे साठमार मुळातच तज्ञ होते, ते हत्तीला जखम होऊ न देता चिमटे लावायचे. क्वचित जखम झालीच तर ती लगेच भरुन यायची. पण यावेळी मात्र बर्चीबहाद्दरला आततायीपणे चिमटे लावण्यात आले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी त्याच्या पायाला चिमटा मारला तिथे त्याला मोठी जखम झाली. दिवसागणिक ती जखम फारच बळावत गेली. बर्चीबहाद्दरच्या हालचाली मंदावल्या. उदास अवस्थेत उभा असलेला बर्चीबहाद्दर व त्याची ती भेसूर जखम पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जायचे. त्याचे धनी छत्रपती शहाजी महाराज हे स्वतः मोठे प्राणीप्रेमी होते. त्यांनी अनेक तज्ञ मंडळी आणून, हरतऱ्हेचे प्रयत्न केले पण कशाचाही काहीही उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस लाडक्या ‘बर्ची’ची प्रकृती खालावत जाऊ लागली. त्याची अवस्था इतकी वाईट झाली की बर्चीबहाद्दरला मरण देऊन त्याला या मरणयातनांतून कायमचे मुक्त करावे असाही सूर लोकांतून उमटू लागला. बर्चीबहादरच्या या मरणयातना कदाचित त्या पशुपती महादेवालाही पहावल्या नसाव्यात. म्हणूनच त्याने बर्चीला यातून कायमचे मुक्त केले…..
दि. ९ अॉगस्ट १९७० रोजी छत्रपतींच्या लाडक्या बर्चीबहाद्दरने अखेरचा श्वास घेतला. ज्याचे असणे नगारखान्याच्या भव्यतेचे कोंदण होते, ती नगारखान्याची भव्यता हरपली.  

ज्याने दसऱ्याचे ‘शिलंगण’ गाजवले तो बर्चीबहाद्दर आता परत राजवाड्यात दिसणार नव्हता….

ज्याच्या आक्रमक हालचालींमुळे साठमारीचे भक्कम आगडदेखील हादरायचे तो बर्चीबहाद्दर आता कसलीच हालचाल करत नव्हता…………

©KarvirRiyasatFB                                      – अजयसिंह पाटील

माहितीचे स्त्रोत –                                    
१) प्रत्यक्षदर्शी मंडळी,
२) कोल्हापूरच्या पाऊलखुणा (लेखक – सुधाकर काशिद) ,                                  
३) छत्रपती शाहू स्मृतीदर्शन (संपादक – हिंदूराव साळुंखे)

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा

म्हैसूर संस्थानचा दसरा देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचपाठोपाठ करवीर राज्याच्या शाही सीमोल्लंघन सोहळ्यालादेखील तितकेच, किंबहुना आपल्या दृष्टीने त्याहून अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. 

आपट्याचे पूजन करताना श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज व छत्रपतींचे सरदार जहागीरदार… सोबत पौरोहित्य करताना मराठा पुरोहित…ऐतिहासिक व प्रचंड दुर्मिळ छायाचित्र. 

करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूरमध्ये दरवर्षी आयोजीत केल्या जाणाऱ्या शाही दसरा महोत्सवास जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र हा शाही दसरा सोहळा नावारुपास आला तो राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात. शाहू महाराजांनी या सोहळ्याला एक वेगळेच वैभव प्राप्त करुन दिले. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या दसरा चौकामध्ये हा सोहळा पार पडतो. दसरा सोहळ्यासाठी जी मिरवणूक निघते त्या मिरवणूकीस “छबिना मिरवणूक” म्हणून ओळखले जाते. छत्रपतीकालीन छबिना मिरवणूकीमध्ये शाही हत्ती, अश्वारुढ सरदार, दरबारी मानकरी, बंदूक बारदार, तोफा त्याचबरोबर वाघ, चित्ते, बिबटे असे जंगली प्राणीदेखील असायचे. छत्रपतींकडे अडीचशेहून अधिक हत्ती होते. त्यांपैकी छबिना मिरवणूकीच्या अग्रभागी “जंगबहादूर” हत्ती असायचा. सोन्या – चांदीच्या दागिन्यांनी मढविलेल्या जंगबहादूर हत्तीवर छत नसलेला रिकामा चांदीचा हौदा असायचा व त्यावर सोनेरी किनार असलेला मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकायचा. जंगबहादूरच्या मागे तलवारी घेतलेले छत्रपतींचे धारकरी पायी चालायचे. या धारकऱ्यांमागे अंबाबाई, छत्रपती शिवाजी महाराज व गुरु महाराज (छत्रपती घराण्याचे अध्यात्मिक गुरु) यांच्या पालख्या असायच्या व पाठोपाठ छत्रपती महाराज सोन्याच्या दागिन्यांनी मढविलेल्या “मोतीगज” या भव्य शाही हत्तीवर चांदीच्या अंबारीमध्ये विराजमान असायचे. छत्रपतींच्या शाही हत्तीमागे घोडेस्वार मानकरी व सरदार तीन-तीनच्या रांगेत चालायचे. या घोडेस्वारांमागे चांदीचा रिकामा हौदा लादलेला “बर्चीबहाद्दर” हत्ती डौलाने चालायचा. बर्चीबहाद्दरच्या मागे छत्रपतींच्या शिकारखान्यातील वाघ, चित्ते, बिबटे या शिकारी प्राण्यांचे पिंजरे असायचे व सर्वांत शेवटी तोफखाना असायचा. अशी ही शाही व वैभवशाली छबिना मिरवणूक छत्रपतींच्या जुन्या राजवाड्यातून दसरा चौकामध्ये यायची. छत्रपतींची स्वारी चौकात आल्यानंतर छत्रपतींना तोफांची सलामी दिली जायची. यानंतर छत्रपती महाराज लकडकोटावर ठेवलेल्या आपट्यांच्या पानांची पूजा करायचे व यानंतरच जमलेले सर्व लोक प्रथम छत्रपतींना आपट्याची पाने द्यायचे व नंतर एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसरा साजरा करायचे. 

सीमोल्लंघनासाठी दसरा चौकामध्ये उपस्थित छत्रपति राजाराम महाराज व शाही लवाजमा. एक ऐतिहासिक अमूल्य छायाचित्र

आजदेखील ही शाही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरु आहे. छत्रपती महाराजांच्या “छत्रपती देवस्थान ट्रस्ट“मार्फत शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन केले जाते. आजही छबिना मिरवणूकीची परंपरा व सरंजाम पूर्वीप्रमाणेच सुरु आहे, फक्त छत्रपतींच्या शाही हत्तींची जागा ऐंशी वर्षांपूर्वी मेबॅक  या शाही कारने घेतली आहे.  शिकारी प्राणी आता छबिना मिरवणूकीत नसतात, मात्र इतर सर्व सरंजाम पूर्वीच्या परंपरेनुसार आजही सुरु आहे. फरक इतकाच, छत्रपती पूर्वी जुन्या राजवाड्यातून यायचे पण ऐंशी वर्षांपासून हि प्रथा बदलली आहे. छबिना मिरवणूक जुन्या राजवाड्याहून येते व छत्रपती महाराज नवीन राजवाड्याहून येतात. तेव्हापासून जुन्या राजवाड्यातून छबिना मिरवणूक येताना हत्तीवर बसण्याचा मान “सरखवास गायकवाड” घराण्यास होता पण हल्ली ही प्रथा बंद होऊन सरखवास गायकवाड हेदेखील नवीन राजवाड्याहून छत्रपती महाराजांबरोबरच येतात.    

याठिकाणी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सीमोल्लंघनासाठी राजवाड्यातून प्रस्थान करण्यापूर्वी स्वतः छत्रपती महाराज आपल्या पूर्वजांच्या वापरातील जोड्यांचे दर्शन घेतात. हे जोडे अत्यंत प्राचीन असून त्यामध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराज, राजाराम महाराज यांचेही जोडे आहेत, शिवाय खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील जोडे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सर्व जोड्यांना चंदनाचे तेल लावलेले असते.

नवीन राजवाड्याहून छत्रपती महाराज (हुजूर स्वारी) मेबॅक या खास छत्रपतींसाठी तयार केलेल्या कारमधून येतात. हुजूर स्वारीची अगवाणी    महाराष्ट्र पोलिस दलाचे जवान करतात, तर शाही स्वारीच्या मागे छत्रपतींचे मानकरी शाही वाहनांमधून येतात. 

 महाराष्ट्र पोलिस दल व शाही मानकऱ्यांच्या ताफ्यासह मेबॅक कारमधून छत्रपती महाराज दसरा चौकाकडे येत असताना….

हुजूर स्वारी दसरा चौकात आल्यानंतर तोफा व बंदुकांच्या फैरी झाडून छत्रपतींना सलामी दिली जाते. यानंतर महाराष्ट्र पोलीस बँड व स्थानिक लष्करी दल करवीर राज्याच्या राष्ट्रगीताची धून वाजवून छत्रपतींना सलामी देतात. 

छत्रपती महाराजांचे दसरा चौकात आगमन झाल्यानंतर महाराजांना सलामी देताना महाराष्ट्र पोलिस दलाचे बँड पथक

पोलिस दलाच्या सलामीनंतर सरदार-जहागिरदारांचे मुजरे स्वीकारत छत्रपती महाराज  आसनस्थानाकडे येतात. याठिकाणी मराठा लाईट इंन्फंट्रीचे वरीष्ठ अधिकारी, पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री व कोल्हापूरातील प्रतिष्ठित मंडळी छत्रपतींना अभिवादन करतात. यानंतर छत्रपती लकडकोटाकडे येतात. त्याठिकाणी छत्रपतींच्या हस्ते आपट्याचे पूजन केले जाते. यावेळी मराठा समाजाचे पुरोहित पौरोहित्य करतात. 

आपट्याचे पूजन करताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, युवराजकुमार शहाजीराजे व राजकुमार यशराजराजे

छत्रपतींनी आपट्याचे पूजन केल्यानंतर जमलेले सर्व लोक शाही आपट्याची पाने घेण्यासाठी लकडकोटावर तुटून पडतात. दरम्यान छत्रपतींची स्वारी मेबॅक मधून जुन्या राजवाड्याकडे प्रस्थान करते. यावेळी छत्रपतींना सोने देण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड उडालेली असते. 

छत्रपतींना दसर्याचे सोने देण्यासाठी उडालेली झुंबड..

 छत्रपती आपल्या ताफ्यासह जुन्या राजवाड्यावर आल्यानंतर त्याठिकाणी दसऱ्याचा शाही दरबार पार पडतो. दरबार विसर्जित झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत छत्रपती करवीरच्या जनतेचे सोने स्वीकारत असतात. अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेला, फक्त कोल्हापूरच्याच नव्हे, तर अखिल मराठा साम्राज्याच्या शाही वैभवशाली सीमोल्लंघन सोहळ्यास प्रत्येकाने आपली उपस्थिती लावावी व आपल्या वैभवशाली परंपरेचे साक्षीदार व्हावे. सोबतच कोल्हापूरच्या शाही दसर्याचे आणखी काही फोटो पहा…. (फोटो सौजन्य – आदित्य वेल्हाळ, दिपक सपाटे व सन्मान शेटे)

हा लेख आपल्याला कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा व पुढील लिंक ओपन करुन आमचे फेसबुक पेज लाईक करा…                         https://www.facebook.com/KarvirRiyasat/

राजेशाही थाटाचे मंदिर

कोल्हापूरच्या पूर्वेस ४५ किलोमीटरवर असणाऱ्या ‘शिरोळ‘ या तालुक्याच्या गावामध्ये छत्रपतींचे सरदार घारगे-देसाई यांनी बांधलेले श्री विठ्ठलाचे ऐतिहासिक मंदिर आहे. अत्यंत सुबक शिल्पकला आपल्याला याठिकाणी पहायला मिळते. हे मंदिर जरी असले तरी कुण्या जहागिरदाराचा राजवाडा शोभावा असा याचा दिमाख आहे. मंदिराचा भव्य व प्रशस्त सभामंडप व त्यातील अँटीक झुंबर एखाद्या राजदरबाराची आठवण करुन देतात. या सभामंडपामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी चितारलेली हिंदू देवतांची चित्रे आहेत. याशिवाय छत्रपति शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपति शाहू महाराज, कोल्हापूरचे छत्रपति राजाराम व छत्रपति शहाजी महाराज यांचे पोर्ट्रेटस् देखील या मंदिरात आहेत.

या मंदिराची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, जवळपास शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराच्या लोखंडी रेलिंग्जवर शककर्ते छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा घडविण्यात आलेली आहे. महाराजांची प्रतिमा असलेले हे रेलिंग्जदेखील शंभर वर्षांहूनही अधिक जुने आहेत. हे मंदिर शिरोळच्या मध्यमागी अगदी वर्दळीच्या ठिकाणी आहे. पण मंदिराच्या रेलिंग्ज उंचावर असल्याने व त्यावर महाराजांची प्रतिमा आहे, हे सहजासहजी लक्षात येत नसल्याने अनेकांचे या ऐतिहासिक दौलतीकडे दुर्लक्ष होते. पुण्यातील अगदी मोजक्या वाड्यांवर महाराजांची प्रतिमा असलेल्या अशा रेलिंग्ज आढळतात पण सध्या अशाप्रकारच्या ऐतिहासिक रेलिंग्ज अत्यंत दुर्मिळ आहेत. नृसिंहवाडीस जाताना वाटेतच लागणाऱ्या या मंदिरास वेळात वेळ काढून एकदा अवश्य भेट द्यावी.

पूर्वापार जनतेचे शिवरायांवर असलेले नितळ प्रेम अनुभवण्यासाठी, मंदिराच्या शिल्पकलेसाठी, त्यातील दस्तुरखुद्द राजा रविवर्मांनी रेखाटलेल्या चित्रांसाठी, मंदिराचा राजेशाही थाट अनुभवण्यासाठी प्रत्येक इतिहासप्रेमीने हे मंदिर आवर्जून पहावे.

https://www.facebook.com/KarvirRiyasat/

#KarvirRiyasatFB #करवीर_राज्य

करवीर छत्रपतींच्या इतिहासाचा मूक साक्षीदार 

कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक व राजकीयदृष्ट्या प्रसिद्ध असलेला आणि सधन तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील ‘अकिवाट’ हे गाव महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे ते त्या गावात अर्धांगवायुवर देण्यात येणाऱ्या औषधासाठी. दोन दिवसांपूर्वी शिल्पकलेचा उत्तम नजराणा असलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी आमचे बंधू सुशांत जाधव, प्रतिक शिंदे व अर्जुनवाडचे मित्र इतिहास अभ्यासक अजयसिंह पाटील यांच्यासोबत गेलो होतो. कोपेश्वर मंदिर अप्रतिम आहे. पण काहीसे दुर्लक्षित आहे. या मंदिराविषयी पुन्हा कधीतरी लिहू. तर कोपेश्वर मंदिर पाहून परत येत असताना कोल्हापूरचे छत्रपती व या परिसराचा कशाप्रकारे संबंध येत होता, या विषयावर प्रवासादरम्यान आमची चर्चा सुरु होती. या चर्चेमध्ये ‘अकिवाट’ या गावी छत्रपतींची एक मोठी गढी व लष्करी ठाणे होते, असे अजयसिंह पाटील यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे वाटेतच असणाऱ्या अकिवाट या गावी थांबण्याचे आम्ही ठरविले. गावात बाजाराचा दिवस होता. त्यामुळे बरीच गर्दी होती. गाव तसं मेन रोडलगतच आहे. गाडी योग्य ठिकाणी लावून चालतच आम्ही बाजारात शिरलो. थोडच अंतर चालल्यानंतर आम्हाला भलामोठा बुरुज दिसला. आम्ही त्या बुरुजाच्या जवळ जाऊन थोडं निरखून पाहू लागलो. बुरुजाच्या आजूबाजूला सर्वत्र दाट लोकवस्ती होती. आम्ही आमच्यापरीने अंदाज बांधत या बुरुजाची छायाचित्रे घेऊ लागताच गावातील काही लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं आणि बरेचजण आमच्या भोवती जमा झाले. या जमलेल्या घोळक्यातून एक बऱ्यापैकी वयस्कर गृहस्थाला आम्ही बोलते करण्याचा प्रयत्न केला. या गृहस्थाचे नाव कल्लाप्पा कोळी होते. ते अगदी आत्मीयतेने बुरुजाविषयी माहिती देऊ लागले, “पूर्वी या गावाभोवती मोठी तटबंदी होती व त्या तटबंदीला या बुरुजासारखेच असे एकूण ५२ बुरुज होते.” शेजारी असलेल्या विजेच्या खांबाकडे बोट दाखवत ते म्हणाले, “याच्यापेक्षा दुप्पट उंचीचा आणि बैलगाडी घेऊन फिरता येईल एवढ्या रुंदीचा तट होता. आणि त्याभोवती तटाएवढ्याच उंचीचा खोल खंदक होता. खंदक नेहमी पाण्याने भरलेला असायचा.” काही वर्षांपूर्वी तटबंदी व इतर बुरुज पाडून त्याठिकाणी लोकांचे इमले उभे राहिले. बाजूचा खंदक मुजवून टाकला. इतिहासाची साक्ष म्हणून बावन्न बुरुजांपैकी दोन बुरुज तसेच ठेवण्यात आले. आज जरी याठिकाणी एकच बुरुज दिसत असला तरी या बुरुजासमोरच दुसरा एक बुरुज होता व त्यादरम्यान भव्य कमान (वेस) होती. गावात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. त्यामुळे वाहतूकीस अडचण होऊ नये म्हणून १९७२ च्या दरम्यान हि कमान पाडून टाकण्यात आली व अगदी अलिकडच्या काळात या बुरुजासमोर उभा असणारा दुसरा बुरुजही पाडण्यात आला. या पाडलेल्या बुरुजाच्या ताज्या खुणा आजही इथे दिसतात. ते गृहस्थ पुढे सांगू लागले, “या दरवाजावर दोन पहारेकरी असत व गावातील ओळख सांगितल्याशिवाय बाहेरच्या व्यक्तीला ते आत सोडत नसत.” दरवाजावर दोन पहारेकरी असायचे आणि ते कोळी जातीचे असत हे सांगताना मात्र त्यांच्या वाणीतील अभिमान व चेहऱ्यावरील चमक स्पष्टपणे जाणवत होती.

“हे कोणी बांधलं असेल ? याची मालकी कुणाकडे होती ?” असे विचारल्यावर त्यांनी पटकन उत्तर दिले, “कोल्हापूरच्या राजाची मालकी व्हती ! शाहूराजाची गढी व्हती…!”

अर्थातच !

छत्रपतींच्या लष्करी ठाण्याची व गढीची माहिती देताना स्थानिक रहिवासी कल्लाप्पा कोळी…

करवीर छत्रपति महाराजांच्या वैभवशाली इतिहासाला स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचा एक पैलू इथेच पडला होता. त्या वैभवशाली पराक्रमाची, या गढीच्या स्वाभिमानाची संसदर्भ गाथा अजयसिंह पाटील आम्हाला सांगत होते…..
त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर छत्रपति शिवरायांचे पणतू छत्रपति दुसरे शिवाजी महाराज राज्य करीत होते. तर सातारच्या गादीची सत्ता पेशव्यांनी बळकावली होती. कोल्हापूरच्या छत्रपतिंना उपद्रव देऊन त्यांचेही राज्य बळकावण्यासाठी पेशवे नानाविध खटपटी करीत होते. याच खटपटींचा एक भाग म्हणजे कोल्हापूर राज्याच्या सीमेवर तासगाव व मिरज येथे त्यांनी सरदार पटवर्धनांची नेमणूक केली होती. परशुरामभाऊ पटवर्धन सुरापूरच्या मोहिमेवर असताना नाना फडणीसाने त्यांना पत्र पाठवले, “सुरापूरच्या खंडणीचा उलगडा झाल्यावर तुम्ही करवीरकर महाराज व कित्तूरकर देसाई यांच्या तालुक्यात जाऊन त्या उभयतांचा बंदोबस्त करावा.” या पत्रानुसार खुद्द छत्रपति महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी एप्रिल १७७९ साली परशुरामभाऊ रवाना झाला. अकिवाट व शिरोळ ही कोल्हापूर राज्याची महत्त्वाची ठाणी हस्तगत करण्याचा त्यांचा मनोदय होता. यासाठी त्यांनी मिरजेच्या गंगाधरराव पटवर्धनास “पंचवीस-तीस खंडी दारु, पाच-सात मोठ्या तोफा, शेपन्नास कामाठी व गोलंदाज तयार ठेवण्यास” सांगितले. अकिवाटचे मजबूत ठाणे परशुरामला वाटले तितक्या सहजपणे हस्तगत होण्यासारखे नव्हते. या ठाण्याभोवती पटवर्धनांच्या फौजेचा तीन आठवडे वेढा पडला होता. पटवर्धनांनी मोर्चेबंदी करुन तोफांचा जोरदार मारा चालवला, यामुळे तटाच्या भिंतीला खिंडारे पडून छत्रपतींच्या आतील फौजेला धोका निर्माण झाला. तरीदेखील ठाण्यातील लोकांनी शरणागती पत्करली नाही. छत्रपतींचीच फौज ती ! जीवावर उदार होऊन मोठ्या शर्थीने ठाणे झुंजवले पण हार पत्करुन कौल मागितला नाही. पटवर्धनांच्या वेढ्यामुळे ठाण्याची रसद तुटली होती. कालांतराने आतील रसदही संपली पण तरीदेखील छत्रपतींच्या फौजेने ठाणे सोडले नाही. परिणाम समोर दिसत होता पण आपण छत्रपतींचे पाईक आहोत आणि यास शोभेल असाच लढा आपल्याला द्यायचा आहे हि गोष्ट ते विसरले नव्हते. स्वाभिमान ढळू न देता, धीर खचू न देता ते लढतच राहिले. अगदी शेवटचा सैनिक धारातिर्थी पडेपर्यंत हि लढाई सुरु होती. शेवटी अकिवाटचे ठाणे पटवर्धनाच्या हाती पडलेच पण अकिवाटच्या शिलेदारांनी अशी काही झुंज दिली होती कि त्यामुळे पटवर्धनांचे जबरदस्त नुकसान होऊन अकिवाट जिंकल्यानंतर शिरोळचे ठाणे जिंकायचा पूर्वनियोजित बेत त्यांना रद्द करावा लागला.

“हे ठाणे काबीज होईपर्यंत भाऊंची फार हानी झाली. नुसत्या हल्ल्यातच त्यांचे नामीनामी दोन-तीनशे माणूस ठार पडले आणि तलवारीच्या व दगडाच्या जखमा लागलेल्यांची संख्या सातशेपासून आठशेपर्यंत होती.” अकिवाटचे ठाणे जरी हाती आले तरी पटवर्धनास त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली होती.

छत्रपतींच्या अकिवाट येथील लष्करी ठाण्याचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज… छायाचित्रात दिसतोय त्याहीपेक्षा या बुरुजाची उंची जास्त होती पण दुर्लक्षामुळे बुरुजाचा वरील भाग ढासळलेला आहे.

पुढे दोनच वर्षांत कोल्हापूरचे छत्रपति शिवाजी महाराज व पेशव्यांमध्ये तह होऊन या तहातील एका कलमानुसार पेशव्यांनी अकिवाटचे ठाणे छत्रपतींना परत दिले आणि सन १७८१ साली अकिवाटचे हे बुलंद ठाणे महाराज छत्रपति स्वामींचे सेवेसी पुन्हा एकदा रुजू झाले

“शेवटचा सैनिक धारातीर्थी पडेपर्यंत ते लढले, ते परास्त झाले पण असे झुंजले की शत्रूला विजयाचा जल्लोष करण्याचीही इच्छा राहीली नाही आणि पुढचा विजय मिळविण्याएवढी ताकदही उरली नाही…..” त्या स्वाभिमानी विरांच्या स्मृती उराशी कवटाळून तो बुरुज उभा आहे.

छत्रपतींच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांच्या साथीने त्याने शत्रूशी मुकाबला केला, ते त्याचे साथीदार आता अस्तित्वात नाहीत…. त्याला कौतुकाने सांगायची आहे त्यांच्या पराक्रमाची गाथा…. पण कौतुकाने ऐकणारे आता कुणी नाहीत… कदाचित म्हणूनच तो शांतपणे उभा आहे, छत्रपतींच्या इतिहासाचा ‘मूक’ साक्षीदार होऊन…..