करवीर छत्रपतींच्या इतिहासाचा मूक साक्षीदार 

कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक व राजकीयदृष्ट्या प्रसिद्ध असलेला आणि सधन तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील ‘अकिवाट’ हे गाव महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे ते त्या गावात अर्धांगवायुवर देण्यात येणाऱ्या औषधासाठी. दोन दिवसांपूर्वी शिल्पकलेचा उत्तम नजराणा असलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी आमचे बंधू सुशांत जाधव, प्रतिक शिंदे व अर्जुनवाडचे मित्र इतिहास अभ्यासक अजयसिंह पाटील यांच्यासोबत गेलो होतो. कोपेश्वर मंदिर अप्रतिम आहे. पण काहीसे दुर्लक्षित आहे. या मंदिराविषयी पुन्हा कधीतरी लिहू. तर कोपेश्वर मंदिर पाहून परत येत असताना कोल्हापूरचे छत्रपती व या परिसराचा कशाप्रकारे संबंध येत होता, या विषयावर प्रवासादरम्यान आमची चर्चा सुरु होती. या चर्चेमध्ये ‘अकिवाट’ या गावी छत्रपतींची एक मोठी गढी व लष्करी ठाणे होते, असे अजयसिंह पाटील यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे वाटेतच असणाऱ्या अकिवाट या गावी थांबण्याचे आम्ही ठरविले. गावात बाजाराचा दिवस होता. त्यामुळे बरीच गर्दी होती. गाव तसं मेन रोडलगतच आहे. गाडी योग्य ठिकाणी लावून चालतच आम्ही बाजारात शिरलो. थोडच अंतर चालल्यानंतर आम्हाला भलामोठा बुरुज दिसला. आम्ही त्या बुरुजाच्या जवळ जाऊन थोडं निरखून पाहू लागलो. बुरुजाच्या आजूबाजूला सर्वत्र दाट लोकवस्ती होती. आम्ही आमच्यापरीने अंदाज बांधत या बुरुजाची छायाचित्रे घेऊ लागताच गावातील काही लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं आणि बरेचजण आमच्या भोवती जमा झाले. या जमलेल्या घोळक्यातून एक बऱ्यापैकी वयस्कर गृहस्थाला आम्ही बोलते करण्याचा प्रयत्न केला. या गृहस्थाचे नाव कल्लाप्पा कोळी होते. ते अगदी आत्मीयतेने बुरुजाविषयी माहिती देऊ लागले, “पूर्वी या गावाभोवती मोठी तटबंदी होती व त्या तटबंदीला या बुरुजासारखेच असे एकूण ५२ बुरुज होते.” शेजारी असलेल्या विजेच्या खांबाकडे बोट दाखवत ते म्हणाले, “याच्यापेक्षा दुप्पट उंचीचा आणि बैलगाडी घेऊन फिरता येईल एवढ्या रुंदीचा तट होता. आणि त्याभोवती तटाएवढ्याच उंचीचा खोल खंदक होता. खंदक नेहमी पाण्याने भरलेला असायचा.” काही वर्षांपूर्वी तटबंदी व इतर बुरुज पाडून त्याठिकाणी लोकांचे इमले उभे राहिले. बाजूचा खंदक मुजवून टाकला. इतिहासाची साक्ष म्हणून बावन्न बुरुजांपैकी दोन बुरुज तसेच ठेवण्यात आले. आज जरी याठिकाणी एकच बुरुज दिसत असला तरी या बुरुजासमोरच दुसरा एक बुरुज होता व त्यादरम्यान भव्य कमान (वेस) होती. गावात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. त्यामुळे वाहतूकीस अडचण होऊ नये म्हणून १९७२ च्या दरम्यान हि कमान पाडून टाकण्यात आली व अगदी अलिकडच्या काळात या बुरुजासमोर उभा असणारा दुसरा बुरुजही पाडण्यात आला. या पाडलेल्या बुरुजाच्या ताज्या खुणा आजही इथे दिसतात. ते गृहस्थ पुढे सांगू लागले, “या दरवाजावर दोन पहारेकरी असत व गावातील ओळख सांगितल्याशिवाय बाहेरच्या व्यक्तीला ते आत सोडत नसत.” दरवाजावर दोन पहारेकरी असायचे आणि ते कोळी जातीचे असत हे सांगताना मात्र त्यांच्या वाणीतील अभिमान व चेहऱ्यावरील चमक स्पष्टपणे जाणवत होती.

“हे कोणी बांधलं असेल ? याची मालकी कुणाकडे होती ?” असे विचारल्यावर त्यांनी पटकन उत्तर दिले, “कोल्हापूरच्या राजाची मालकी व्हती ! शाहूराजाची गढी व्हती…!”

अर्थातच !

छत्रपतींच्या लष्करी ठाण्याची व गढीची माहिती देताना स्थानिक रहिवासी कल्लाप्पा कोळी…

करवीर छत्रपति महाराजांच्या वैभवशाली इतिहासाला स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचा एक पैलू इथेच पडला होता. त्या वैभवशाली पराक्रमाची, या गढीच्या स्वाभिमानाची संसदर्भ गाथा अजयसिंह पाटील आम्हाला सांगत होते…..
त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर छत्रपति शिवरायांचे पणतू छत्रपति दुसरे शिवाजी महाराज राज्य करीत होते. तर सातारच्या गादीची सत्ता पेशव्यांनी बळकावली होती. कोल्हापूरच्या छत्रपतिंना उपद्रव देऊन त्यांचेही राज्य बळकावण्यासाठी पेशवे नानाविध खटपटी करीत होते. याच खटपटींचा एक भाग म्हणजे कोल्हापूर राज्याच्या सीमेवर तासगाव व मिरज येथे त्यांनी सरदार पटवर्धनांची नेमणूक केली होती. परशुरामभाऊ पटवर्धन सुरापूरच्या मोहिमेवर असताना नाना फडणीसाने त्यांना पत्र पाठवले, “सुरापूरच्या खंडणीचा उलगडा झाल्यावर तुम्ही करवीरकर महाराज व कित्तूरकर देसाई यांच्या तालुक्यात जाऊन त्या उभयतांचा बंदोबस्त करावा.” या पत्रानुसार खुद्द छत्रपति महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी एप्रिल १७७९ साली परशुरामभाऊ रवाना झाला. अकिवाट व शिरोळ ही कोल्हापूर राज्याची महत्त्वाची ठाणी हस्तगत करण्याचा त्यांचा मनोदय होता. यासाठी त्यांनी मिरजेच्या गंगाधरराव पटवर्धनास “पंचवीस-तीस खंडी दारु, पाच-सात मोठ्या तोफा, शेपन्नास कामाठी व गोलंदाज तयार ठेवण्यास” सांगितले. अकिवाटचे मजबूत ठाणे परशुरामला वाटले तितक्या सहजपणे हस्तगत होण्यासारखे नव्हते. या ठाण्याभोवती पटवर्धनांच्या फौजेचा तीन आठवडे वेढा पडला होता. पटवर्धनांनी मोर्चेबंदी करुन तोफांचा जोरदार मारा चालवला, यामुळे तटाच्या भिंतीला खिंडारे पडून छत्रपतींच्या आतील फौजेला धोका निर्माण झाला. तरीदेखील ठाण्यातील लोकांनी शरणागती पत्करली नाही. छत्रपतींचीच फौज ती ! जीवावर उदार होऊन मोठ्या शर्थीने ठाणे झुंजवले पण हार पत्करुन कौल मागितला नाही. पटवर्धनांच्या वेढ्यामुळे ठाण्याची रसद तुटली होती. कालांतराने आतील रसदही संपली पण तरीदेखील छत्रपतींच्या फौजेने ठाणे सोडले नाही. परिणाम समोर दिसत होता पण आपण छत्रपतींचे पाईक आहोत आणि यास शोभेल असाच लढा आपल्याला द्यायचा आहे हि गोष्ट ते विसरले नव्हते. स्वाभिमान ढळू न देता, धीर खचू न देता ते लढतच राहिले. अगदी शेवटचा सैनिक धारातिर्थी पडेपर्यंत हि लढाई सुरु होती. शेवटी अकिवाटचे ठाणे पटवर्धनाच्या हाती पडलेच पण अकिवाटच्या शिलेदारांनी अशी काही झुंज दिली होती कि त्यामुळे पटवर्धनांचे जबरदस्त नुकसान होऊन अकिवाट जिंकल्यानंतर शिरोळचे ठाणे जिंकायचा पूर्वनियोजित बेत त्यांना रद्द करावा लागला.

“हे ठाणे काबीज होईपर्यंत भाऊंची फार हानी झाली. नुसत्या हल्ल्यातच त्यांचे नामीनामी दोन-तीनशे माणूस ठार पडले आणि तलवारीच्या व दगडाच्या जखमा लागलेल्यांची संख्या सातशेपासून आठशेपर्यंत होती.” अकिवाटचे ठाणे जरी हाती आले तरी पटवर्धनास त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली होती.

छत्रपतींच्या अकिवाट येथील लष्करी ठाण्याचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज… छायाचित्रात दिसतोय त्याहीपेक्षा या बुरुजाची उंची जास्त होती पण दुर्लक्षामुळे बुरुजाचा वरील भाग ढासळलेला आहे.

पुढे दोनच वर्षांत कोल्हापूरचे छत्रपति शिवाजी महाराज व पेशव्यांमध्ये तह होऊन या तहातील एका कलमानुसार पेशव्यांनी अकिवाटचे ठाणे छत्रपतींना परत दिले आणि सन १७८१ साली अकिवाटचे हे बुलंद ठाणे महाराज छत्रपति स्वामींचे सेवेसी पुन्हा एकदा रुजू झाले

“शेवटचा सैनिक धारातीर्थी पडेपर्यंत ते लढले, ते परास्त झाले पण असे झुंजले की शत्रूला विजयाचा जल्लोष करण्याचीही इच्छा राहीली नाही आणि पुढचा विजय मिळविण्याएवढी ताकदही उरली नाही…..” त्या स्वाभिमानी विरांच्या स्मृती उराशी कवटाळून तो बुरुज उभा आहे.

छत्रपतींच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांच्या साथीने त्याने शत्रूशी मुकाबला केला, ते त्याचे साथीदार आता अस्तित्वात नाहीत…. त्याला कौतुकाने सांगायची आहे त्यांच्या पराक्रमाची गाथा…. पण कौतुकाने ऐकणारे आता कुणी नाहीत… कदाचित म्हणूनच तो शांतपणे उभा आहे, छत्रपतींच्या इतिहासाचा ‘मूक’ साक्षीदार होऊन…..

3 thoughts on “करवीर छत्रपतींच्या इतिहासाचा मूक साक्षीदार 

  1. truly inspiring and motivating history of Our King Rajashri Chatrapati Shahu Maharaj !!!
    great initiative friends for brought it to notice of people around here who still love our King .
    Thanks for such great efforts .. keep it up for GENERATION NEXT !!!
    —–Adv. Maheshrao Jadhav Kolhapur

    Liked by 1 person

  2. खुप छान आशीच गडी पट्टण कोडोली माध्ये त्याचाही सविस्तर अभ्यास व्हावा .

    Liked by 1 person

Leave a comment