मराठा समाजाच्या धार्मिक उन्नतीसाठी क्षात्रजगदगुरू पीठाची स्थापना.

वेदोक्त प्रकरणादरम्यान खुद्द छत्रपतींना पुरोहितशाहीचा प्रचंड मोठा मनस्ताप सोसावा लागला होता. दस्तुरखुद्द छत्रपतींनाच “शुद्र” संबोधण्यापर्यंत पुरोहितांची मजल गेली होती. आपल्याच तुकड्यावर जगणारे हे धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आपल्यालाच अशी वागणूक देत असतील तर आपल्या सर्वसामान्य मराठा प्रजाजनांची काय अवस्था होत असेल याचा शाहू महाराजांनी पूर्ण विचार केला आणि मराठा समाजाने आपले धार्मिक संस्कार आपल्याच जातीतील पुरोहिताकडून करवून घ्यावेत यासाठी वेदशास्त्रसंपन्न मराठा पुरोहित तयार करण्यासाठी महाराजांनी कोल्हापूरमध्ये “श्री शिवाजी वैदिक विद्यालय” स्थापन केले.

महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर धर्मशास्त्रावरील शंकराचार्य पीठाची मनमानी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी क्षत्रिय मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरु पीठ स्थापन करण्याचाही क्रांतिकारी निर्णय महाराजांनी घेतला. त्यानुसार दि. १२ अॉक्टोबर १९२० रोजी शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु पीठाच्या स्थापनेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात आपण ‘क्षात्रजगदगुरु’ पदाची निर्मिती का करत आहोत, याचे सविस्तर स्पष्टीकरण महाराजांनी दिलेले आहे.

क्षत्रिय मराठ्यांच्या जगदगुरु पदासाठी महाराजांनी सदाशिवराव पाटील बेनाडीकर या तरुण गृहस्थाची निवड केली. बेनाडीकर पाटील हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत व तत्त्वज्ञान विषयाचे शिक्षण घेत होते. त्यांचे वृत्तपत्रांतील अनेक लेखही महाराजांच्या वाचनात आले होते. त्यामुळे समाजहिताची तळमळ असणारा असा तरुण व बुद्धिमान व्यक्तीच क्षात्रजगदगुरु या पदासाठी योग्य ठरेल असा महाराजांना विश्वास होता.

दि. ११ नोव्हेंबर १९२० रोजी पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठात सदाशिवरावांना सशास्त्र पट्टाभिषेक होऊन वैदिक मंत्रांच्या घोषात त्यांना ‘क्षात्रजगदगुरु’ पदावर स्थापन करण्यात आले.

पाटगावच्या मौनी महाराजांचा मठ. याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु पीठाची स्थापना केली. फोटो साभार : विकास भोसले

क्षात्रजगदगुरु पीठाची निर्मिती हा महाराजांचा समाजकारण व धर्मकारणातील एक क्रांतिकारी निर्णय होता. वेदोक्त प्रकरणात महाराजांनी मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले होते, मात्र ब्राह्मणांच्या शंकराचार्य पीठाचे मराठ्यांवरील प्रभुत्व नष्ट झालेले नव्हते. आपल्या धर्माचा जगदगुरु म्हणून मराठ्यांना ब्राह्मण जगदगुरुंकडेच जायला लागत होते आणि ब्राह्मण जगदगुरुंचा सुंभ जळाला तरी पीळ कायम होता. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी प्रकरणात तर स्वतः महाराजांचे हात पोळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मराठ्यांना केवळ ब्राह्मण पुरोहितच नव्हे तर ब्राह्मण जगदगुरुच्याही धार्मिक जोखडातून मुक्त करण्यासाठी छत्रपतींनी मराठा पुरोहीत व मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरु पीठ निर्माण केले. मराठ्यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीने छत्रपतींचा हा निर्णय ऐतिहासिक व प्रचंड महत्त्वपूर्ण ठरला.

आपल्या सरदारांनी व मराठा प्रजाजनांनी आपले धार्मिक संस्कार हे क्षात्रजगदगुरु पीठाच्या मराठा पुरोहितांकडूनच करवून घ्यावेत अशी आज्ञा दिली. छत्रपतींच्या या आज्ञेचे अनेकांनी पालन केले. छत्रपती घराण्यातील धार्मिक विधीदेखील मराठा पुरोहितच पार पाडू लागले. शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक क्षात्रजगदगुरुंनीच पार पाडला. मराठा पुरोहिताकडून राज्याभिषेक होणारे राजाराम महाराज हे पहिलेच राजे. राजाराम महाराजांनंतर १९४७ साली शहाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील क्षात्रजगदगुरु व मराठा पुरोहितांनीच पार पाडला. आजही कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे सर्व धार्मिक विधी हे मराठा पुरोहितच पार पाडतात.

धर्मशास्त्राचा प्रमुख हा राजा असतो. राजा सांगेल तो धर्म, हे छत्रपती शाहू महाराजांनी ‘क्षात्रजगदगुरु पीठ’ स्थापन करुन पुन्हा एकदा सिद्ध केले.

Post By : © Karvir Riyasat Facebook Page

दि. ११ नोव्हेंबर १९२० रोजी सदाशिवराव पाटील यांना पट्टाभिषेक होऊन ते क्षात्रजगदगुरु पदी विराजमान झाले त्याप्रसंगीचे दुर्मिळ छायाचित्र.

Leave a comment