राजेशाही थाटाचे मंदिर

कोल्हापूरच्या पूर्वेस ४५ किलोमीटरवर असणाऱ्या ‘शिरोळ‘ या तालुक्याच्या गावामध्ये छत्रपतींचे सरदार घारगे-देसाई यांनी बांधलेले श्री विठ्ठलाचे ऐतिहासिक मंदिर आहे. अत्यंत सुबक शिल्पकला आपल्याला याठिकाणी पहायला मिळते. हे मंदिर जरी असले तरी कुण्या जहागिरदाराचा राजवाडा शोभावा असा याचा दिमाख आहे. मंदिराचा भव्य व प्रशस्त सभामंडप व त्यातील अँटीक झुंबर एखाद्या राजदरबाराची आठवण करुन देतात. या सभामंडपामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी चितारलेली हिंदू देवतांची चित्रे आहेत. याशिवाय छत्रपति शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपति शाहू महाराज, कोल्हापूरचे छत्रपति राजाराम व छत्रपति शहाजी महाराज यांचे पोर्ट्रेटस् देखील या मंदिरात आहेत.

या मंदिराची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, जवळपास शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराच्या लोखंडी रेलिंग्जवर शककर्ते छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा घडविण्यात आलेली आहे. महाराजांची प्रतिमा असलेले हे रेलिंग्जदेखील शंभर वर्षांहूनही अधिक जुने आहेत. हे मंदिर शिरोळच्या मध्यमागी अगदी वर्दळीच्या ठिकाणी आहे. पण मंदिराच्या रेलिंग्ज उंचावर असल्याने व त्यावर महाराजांची प्रतिमा आहे, हे सहजासहजी लक्षात येत नसल्याने अनेकांचे या ऐतिहासिक दौलतीकडे दुर्लक्ष होते. पुण्यातील अगदी मोजक्या वाड्यांवर महाराजांची प्रतिमा असलेल्या अशा रेलिंग्ज आढळतात पण सध्या अशाप्रकारच्या ऐतिहासिक रेलिंग्ज अत्यंत दुर्मिळ आहेत. नृसिंहवाडीस जाताना वाटेतच लागणाऱ्या या मंदिरास वेळात वेळ काढून एकदा अवश्य भेट द्यावी.

पूर्वापार जनतेचे शिवरायांवर असलेले नितळ प्रेम अनुभवण्यासाठी, मंदिराच्या शिल्पकलेसाठी, त्यातील दस्तुरखुद्द राजा रविवर्मांनी रेखाटलेल्या चित्रांसाठी, मंदिराचा राजेशाही थाट अनुभवण्यासाठी प्रत्येक इतिहासप्रेमीने हे मंदिर आवर्जून पहावे.

https://www.facebook.com/KarvirRiyasat/

#KarvirRiyasatFB #करवीर_राज्य

Leave a comment