कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा

म्हैसूर संस्थानचा दसरा देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचपाठोपाठ करवीर राज्याच्या शाही सीमोल्लंघन सोहळ्यालादेखील तितकेच, किंबहुना आपल्या दृष्टीने त्याहून अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. 

आपट्याचे पूजन करताना श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज व छत्रपतींचे सरदार जहागीरदार… सोबत पौरोहित्य करताना मराठा पुरोहित…ऐतिहासिक व प्रचंड दुर्मिळ छायाचित्र. 

करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूरमध्ये दरवर्षी आयोजीत केल्या जाणाऱ्या शाही दसरा महोत्सवास जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र हा शाही दसरा सोहळा नावारुपास आला तो राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात. शाहू महाराजांनी या सोहळ्याला एक वेगळेच वैभव प्राप्त करुन दिले. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या दसरा चौकामध्ये हा सोहळा पार पडतो. दसरा सोहळ्यासाठी जी मिरवणूक निघते त्या मिरवणूकीस “छबिना मिरवणूक” म्हणून ओळखले जाते. छत्रपतीकालीन छबिना मिरवणूकीमध्ये शाही हत्ती, अश्वारुढ सरदार, दरबारी मानकरी, बंदूक बारदार, तोफा त्याचबरोबर वाघ, चित्ते, बिबटे असे जंगली प्राणीदेखील असायचे. छत्रपतींकडे अडीचशेहून अधिक हत्ती होते. त्यांपैकी छबिना मिरवणूकीच्या अग्रभागी “जंगबहादूर” हत्ती असायचा. सोन्या – चांदीच्या दागिन्यांनी मढविलेल्या जंगबहादूर हत्तीवर छत नसलेला रिकामा चांदीचा हौदा असायचा व त्यावर सोनेरी किनार असलेला मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकायचा. जंगबहादूरच्या मागे तलवारी घेतलेले छत्रपतींचे धारकरी पायी चालायचे. या धारकऱ्यांमागे अंबाबाई, छत्रपती शिवाजी महाराज व गुरु महाराज (छत्रपती घराण्याचे अध्यात्मिक गुरु) यांच्या पालख्या असायच्या व पाठोपाठ छत्रपती महाराज सोन्याच्या दागिन्यांनी मढविलेल्या “मोतीगज” या भव्य शाही हत्तीवर चांदीच्या अंबारीमध्ये विराजमान असायचे. छत्रपतींच्या शाही हत्तीमागे घोडेस्वार मानकरी व सरदार तीन-तीनच्या रांगेत चालायचे. या घोडेस्वारांमागे चांदीचा रिकामा हौदा लादलेला “बर्चीबहाद्दर” हत्ती डौलाने चालायचा. बर्चीबहाद्दरच्या मागे छत्रपतींच्या शिकारखान्यातील वाघ, चित्ते, बिबटे या शिकारी प्राण्यांचे पिंजरे असायचे व सर्वांत शेवटी तोफखाना असायचा. अशी ही शाही व वैभवशाली छबिना मिरवणूक छत्रपतींच्या जुन्या राजवाड्यातून दसरा चौकामध्ये यायची. छत्रपतींची स्वारी चौकात आल्यानंतर छत्रपतींना तोफांची सलामी दिली जायची. यानंतर छत्रपती महाराज लकडकोटावर ठेवलेल्या आपट्यांच्या पानांची पूजा करायचे व यानंतरच जमलेले सर्व लोक प्रथम छत्रपतींना आपट्याची पाने द्यायचे व नंतर एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसरा साजरा करायचे. 

सीमोल्लंघनासाठी दसरा चौकामध्ये उपस्थित छत्रपति राजाराम महाराज व शाही लवाजमा. एक ऐतिहासिक अमूल्य छायाचित्र

आजदेखील ही शाही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरु आहे. छत्रपती महाराजांच्या “छत्रपती देवस्थान ट्रस्ट“मार्फत शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन केले जाते. आजही छबिना मिरवणूकीची परंपरा व सरंजाम पूर्वीप्रमाणेच सुरु आहे, फक्त छत्रपतींच्या शाही हत्तींची जागा ऐंशी वर्षांपूर्वी मेबॅक  या शाही कारने घेतली आहे.  शिकारी प्राणी आता छबिना मिरवणूकीत नसतात, मात्र इतर सर्व सरंजाम पूर्वीच्या परंपरेनुसार आजही सुरु आहे. फरक इतकाच, छत्रपती पूर्वी जुन्या राजवाड्यातून यायचे पण ऐंशी वर्षांपासून हि प्रथा बदलली आहे. छबिना मिरवणूक जुन्या राजवाड्याहून येते व छत्रपती महाराज नवीन राजवाड्याहून येतात. तेव्हापासून जुन्या राजवाड्यातून छबिना मिरवणूक येताना हत्तीवर बसण्याचा मान “सरखवास गायकवाड” घराण्यास होता पण हल्ली ही प्रथा बंद होऊन सरखवास गायकवाड हेदेखील नवीन राजवाड्याहून छत्रपती महाराजांबरोबरच येतात.    

याठिकाणी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सीमोल्लंघनासाठी राजवाड्यातून प्रस्थान करण्यापूर्वी स्वतः छत्रपती महाराज आपल्या पूर्वजांच्या वापरातील जोड्यांचे दर्शन घेतात. हे जोडे अत्यंत प्राचीन असून त्यामध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराज, राजाराम महाराज यांचेही जोडे आहेत, शिवाय खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील जोडे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या सर्व जोड्यांना चंदनाचे तेल लावलेले असते.

नवीन राजवाड्याहून छत्रपती महाराज (हुजूर स्वारी) मेबॅक या खास छत्रपतींसाठी तयार केलेल्या कारमधून येतात. हुजूर स्वारीची अगवाणी    महाराष्ट्र पोलिस दलाचे जवान करतात, तर शाही स्वारीच्या मागे छत्रपतींचे मानकरी शाही वाहनांमधून येतात. 

 महाराष्ट्र पोलिस दल व शाही मानकऱ्यांच्या ताफ्यासह मेबॅक कारमधून छत्रपती महाराज दसरा चौकाकडे येत असताना….

हुजूर स्वारी दसरा चौकात आल्यानंतर तोफा व बंदुकांच्या फैरी झाडून छत्रपतींना सलामी दिली जाते. यानंतर महाराष्ट्र पोलीस बँड व स्थानिक लष्करी दल करवीर राज्याच्या राष्ट्रगीताची धून वाजवून छत्रपतींना सलामी देतात. 

छत्रपती महाराजांचे दसरा चौकात आगमन झाल्यानंतर महाराजांना सलामी देताना महाराष्ट्र पोलिस दलाचे बँड पथक

पोलिस दलाच्या सलामीनंतर सरदार-जहागिरदारांचे मुजरे स्वीकारत छत्रपती महाराज  आसनस्थानाकडे येतात. याठिकाणी मराठा लाईट इंन्फंट्रीचे वरीष्ठ अधिकारी, पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री व कोल्हापूरातील प्रतिष्ठित मंडळी छत्रपतींना अभिवादन करतात. यानंतर छत्रपती लकडकोटाकडे येतात. त्याठिकाणी छत्रपतींच्या हस्ते आपट्याचे पूजन केले जाते. यावेळी मराठा समाजाचे पुरोहित पौरोहित्य करतात. 

आपट्याचे पूजन करताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, युवराजकुमार शहाजीराजे व राजकुमार यशराजराजे

छत्रपतींनी आपट्याचे पूजन केल्यानंतर जमलेले सर्व लोक शाही आपट्याची पाने घेण्यासाठी लकडकोटावर तुटून पडतात. दरम्यान छत्रपतींची स्वारी मेबॅक मधून जुन्या राजवाड्याकडे प्रस्थान करते. यावेळी छत्रपतींना सोने देण्यासाठी कोल्हापूरकरांची झुंबड उडालेली असते. 

छत्रपतींना दसर्याचे सोने देण्यासाठी उडालेली झुंबड..

 छत्रपती आपल्या ताफ्यासह जुन्या राजवाड्यावर आल्यानंतर त्याठिकाणी दसऱ्याचा शाही दरबार पार पडतो. दरबार विसर्जित झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत छत्रपती करवीरच्या जनतेचे सोने स्वीकारत असतात. अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेला, फक्त कोल्हापूरच्याच नव्हे, तर अखिल मराठा साम्राज्याच्या शाही वैभवशाली सीमोल्लंघन सोहळ्यास प्रत्येकाने आपली उपस्थिती लावावी व आपल्या वैभवशाली परंपरेचे साक्षीदार व्हावे. सोबतच कोल्हापूरच्या शाही दसर्याचे आणखी काही फोटो पहा…. (फोटो सौजन्य – आदित्य वेल्हाळ, दिपक सपाटे व सन्मान शेटे)

हा लेख आपल्याला कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा व पुढील लिंक ओपन करुन आमचे फेसबुक पेज लाईक करा…                         https://www.facebook.com/KarvirRiyasat/

5 thoughts on “कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा

  1. हा लेख फार छान आहे. करवीर राज्याची एक मोठी आणि ऐतिहासिक परंपरेबद्दल समजलं.
    मी ह्या पेज कडून अजून अनेक ऐतिहासिक लेख येतील अशी अपेक्षा करतो.

    …निमिष विनोद विश्वासराव

    Liked by 1 person

    1. नक्कीच सर _/\_
      करवीर राज्याचा इतिहास आणि परंपरा सर्वांसमोर आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत…

      Like

Leave a comment