छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले लोकाभिमुख स्मारक

दि. १० नोव्हेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्याची दिल्ली येथे घोषणा केली. शिवरायांचे हे स्मारक म्हणजे महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याबरोबरच महाराजांच्या नावाने एक असे होस्टेल सुरु करणे ज्यामध्ये शंभर मराठा विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होईल, अशी योजनाही शाहू महाराजांनी जाहीर केली. केवळ इतकेच नव्हे तर शिवछत्रपती महाराजांच्या या स्मारकाच्या माध्यमातून देशभरातील मराठ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक धोरणांचे प्रमुख केंद्र महाराजांना स्थापन करावयाचे होते. छत्रपती शाहू महाराजांनी आपली ही योजना सर्व मराठा राजांना पत्राद्वारे कळविली. शिवस्मारकाच्या पुढील कामांसाठी महाराजांनी खासेराव जाधव या गृहस्थांची नेमणूक केली. नोव्हेंबर १९१७ च्या अखेरीस खासेराव जाधवांनी पुण्यातील जागा वगैरे पाहून महाराजांपुढे शिवस्मारकाचे अंदाजपत्रक ठेवले. या अंदाजपत्रकानुसार शिवस्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च येणार होता. महाराजांनी पुण्यामधील भांबुर्डा या गावी साडे सात एकर जमीन एक लाख रुपयांना विकत घेतली. या जागेवर शिवस्मारकाचे बांधकाम सुरु करण्यासाठी पायाभरणी समारंभास दस्तुरखुद्द ब्रिटिश युवराजांनाच आमंत्रित करण्याचे छत्रपतींनी ठरविले. ज्या ब्रिटिशांनी शिवरायांना लुटारु ठरवले, शिवरायांचे गडकोट पाहून मराठ्यांना परत लढण्याची प्रेरणा मिळू नये म्हणून ज्या ब्रिटीशांनी अनेक गडकोट उध्वस्त केले, त्याच ब्रिटिशांच्या भावी राजाच्या हातून शिवरायांच्या स्मारकाची पायाभरणी करण्याचा चंग महाराजांनी बांधला होता.

दि. १९ नोव्हेंबर १९२१ रोजी शिवरायांच्या स्मारकाचा कोनशिला अनावरण तथा पायाभरणी समारंभ छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत व प्रिन्स अॉफ वेल्सच्या हस्ते पार पडला. यावेळी मराठा राजे, सरदार जहागीरदार व हजारो लोक उपस्थित होते. छत्रपती शिवराय व छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून निघत होता. प्रिन्स अॉफ वेल्सचाही जयजयकार होत होता.

प्रिन्स अॉफ वेल्स व श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताना…

याप्रसंगी प्रिन्सला संबोधित करताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, “आपण हि गर्दी व लोकांचा उत्साह पाहून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठा लोकांत किती आदर आहे याची कल्पना करु शकता. शिवाजी महाराज हे राजनीतीकुशल होते. आठ मंत्र्यांचे मंत्रीमंडळ स्थापन करुन महाराजांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची संकल्पना भारतात राबवली. याशिवाय सर्वप्रथम भारतीय आरमार स्थापन करणारेही शिवाजी महाराजच होते. मला खात्री आहे की सन्माननीय प्रिन्स हे शिवाजी महाराजांची ताकद व राजनीतीकौशल्य ओळखण्यास कमी पडणार नाहीत. सन्माननीय प्रिन्स यांना ठाऊकच आहे की मराठा हि जात जन्मापासूनच शूर आहे आणि आजदेखील कलकत्ता शहराभोवतीचा ‘मराठा खंदक’ आमच्या ताकदीची साक्ष देत आहे.” पुढे बोलताना महाराज म्हणाले, “मराठा हा स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आज याठिकाणी उभा आहे. मराठ्यांची हि ताकद ओळखून ब्रिटीश साम्राज्यानेही मराठा समाजास सैन्यामध्ये योग्य जागा दिलेली आहे. आता आमच्यावर हि जबाबदारी आहे की आम्ही शिक्षणाचादेखील पूरेपूर फायदा घेतला पाहिजे. योग्य शिक्षण हा आमचादेखील जन्मजात हक्क आहे. रणमैदानात आम्ही स्वतःला सिद्ध केलेच आहे, आता आम्हाला प्रशासनातही पाय रोवून उभे रहायचे आहे. आम्हाला केवळ आमच्या तलवारीचीच नव्हे तर आमच्या लेखणीचीही ताकद दाखवून द्यायची आहे (not only our swords but our pen).”

प्रिन्स अॉफ वेल्स समोर महाराजांनी अत्यंत परखड भाषण केल्यामुळे उपस्थित जनसमुदायालाही स्फूरण चढले. शिवराय व शाहू महाराजांचा जयजयकार झाला.

यानंतर बोलताना प्रिन्स अॉफ वेल्स म्हणाला, “शिवाजी महाराजांनी केवळ साम्राज्यच उभारले नाही तर एक राष्ट्र घडवले.” किती महत्त्वपूर्ण आहे हे वाक्य ! शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी ब्रिटिश युवराजाला बोलाविण्याच्या महाराजांचा उद्देशच इथे पूर्णपणे साध्य झाला. ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांना लुटारु ठरवले त्याच इंग्रजांच्या राजाला शिवाजी महाराजांचे कर्तृत्व मान्य करुन महाराजांना ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून गौरवण्यासाठी शिवाजी महाराजांच्याच वंशजाने भाग पाडले, हा केवळ योगायोग निश्चितच नव्हता. हि शिवप्रभूंनी आपल्या वंशजास दिलेली ताकद होती.

पुढे बोलताना प्रिन्सने शाहू महाराजांच्या शिवस्मारकाच्या योजनेचेही कौतुक केले. दुसऱ्याच दिवशी ‘टाईम्स अॉफ इंडिया’च्या मुखपृष्ठावर प्रिन्सच्या “Shivaji not only founded an Empire but created a Nation” या उद्गारांच्या हेडलाईनसह सविस्तर बातमी प्रकाशित झाली.

अर्ध्या जगावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांच्या या राजाला छत्रपती शिवरायांसमोर झुकावे लागले आणि अशाप्रकारे ब्रिटिश युवराज ‘प्रिन्स अॉफ वेल्स’ च्या हस्ते शिवरायांच्या जगातील पहिल्या लोकाभिमुख स्मारकाची पायाभरणी पार पडली. शाहू महाराजांचे जीवितकार्य प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली. पुढे या शिवस्मारकाचे बांधकाम व पुढील कारभार सांभाळण्यासाठी ‘अॉल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ची (AISSMS) स्थापना करण्यात आली व छत्रपती महाराज या सोसायटीचे सर्वेसर्वा म्हणून शिवस्मारकाचे काम स्वतः जातीने पाहू लागले. शाहू महाराजांनंतर त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले. अनेक मराठा विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबरच राहण्या खाण्याचीही योग्य सोय होऊ लागली. शाहू महाराजांचे नातू छत्रपती शहाजी महाराज व पणतू कोल्हापूरचे सध्याचे छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे व महाराजकुमार मालोजीराजे यांनी शिवस्मारकाच्या शैक्षणिक कार्याचा प्रचंड विस्तार करुन शाहू महाराजांचे स्वप्न एका वेगळ्या उंचीवर नेऊन सत्यात उतरवले आहे.

आज शिवस्मारकाची ऐतिहासिक पायाभरणी होऊन ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. याबद्दल आपले स्फूर्तीस्थान, दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन तर करुयाच पण त्याचबरोबर यानिमित्त छत्रपती शाहू महाराजांनी दाखविलेल्या राजकीय मुत्सद्दीपणाचेही स्मरण करुन त्यापासून प्रेरणा घेऊया…

Post By : ©Karvir Riyasat Facebook Page

One thought on “छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले लोकाभिमुख स्मारक

Leave a comment