छत्रपती संभाजीराजे… ‘एक राजा माणूस’ (भाग ३)

मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंना मानणारा तरुणांचा मोठा वर्ग तयार झालेला आहे. संभाजीराजे महाराष्ट्रातील तरुणांचे नेतृत्व म्हणून उदयास आले हे आपण मागील भागात पाहिले. मराठ्यांना मिळालेले आरक्षण न्यायालयाने स्थगित केल्यामुळे तो सध्या न्यायप्रविष्ट भाग आहे. आरक्षण परत मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई तूर्तास संपली होती. पण यानंतरही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संभाजीराजेंचे महाराष्ट्रभरात दौरे सुरुच राहिले. गडकोटांच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंनी प्रयत्न सुरु केले. संभाजीराजेंच्या प्रयत्नांतून रायगडावर दरवर्षी पार पडत असलेल्या शिवराज्याभिषेक महोत्सवाने गर्दीचे उच्चांक मोडले. राजेंच्या मागे उभा असलेला जनतेचा मोठा वर्ग पाहता व राजेंचे सामाजिक कार्य पाहता राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान मोदींच्या शिफारशीने संभाजीराजेंची राज्यसभेवर नियुक्ती केली. संभाजीराजेंच्या अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले. संभाजीराजेंच्या नियुक्तीचे समाजातून संमिश्र पडसाद उमटले. पण संभाजीराजेंच्या खासदारकीचे स्वागत करणाऱ्यांची संख्या अधिक होती. संभाजीराजेंनी आजपर्यंत चळवळीच्या माध्यमातून लढा दिला होता. पण चळवळी व आंदोलने करुन फारसे काही पदरात पडत नाही, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी हातात सत्ता हवी हे त्रिवार सत्य संभाजीराजेंना उमगले असावे आणि कदाचित यामुळेच संभाजीराजेंनी राज्यसभा सदस्यत्व स्वीकारले असे म्हणावयास वाव आहे. कारण राज्यसभा सदस्यत्व स्वीकारल्यानंतरची त्यांची कारकीर्द पाहता त्यांनी खासदारकीचा वापर केवळ महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठीच केलेला दिसून येतो. ते खासदार झाल्यानंतर महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या पण कोणत्याही निवडणूकीत ते सक्रीय झाले नाहीत. संभाजीराजे भाजपाचा प्रचार करतील असा भल्याभल्यांचा अंदाज त्यांनी धुळीस मिळवला. त्यांनी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा प्रचारही केला नाही व कोणत्या उमेदवारास पाठींबाही दिला नाही. पक्षीय राजकारणापासून ते पूर्णतः अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान संभाजीराजेंची खासदारकी एका वेगळ्याच कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक दिवस चर्चेत राहिली. ते कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंच्या खासदारकीवर दिलेली प्रतिक्रिया. खासदार झाल्याबद्दल संभाजीराजेंचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः पवारसाहेब कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राजवाड्यात गेले. वाड्यावरही पवारांचा यथोचित पाहुणचार करण्यात आला. यावेळी पवारांना शाही मेजवानी देण्यात आली. वाड्यावरील पाहुणचार स्वीकारल्यानंतर कोल्हापूरात पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंच्या खासदारकीवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि राजेंच्या खासदारकीच्या चर्चा यानंतर महिनाभर वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मिडीया आदी माध्यमांवर रंगू लागल्या.

पवारांच्या वक्तव्यामुळे संभाजीराजेंच्या खासदारकीचा राज्यभर गवगवा झाला. यापूर्वी एखाद्याच्या खासदारकीची एवढी चर्चा व प्रसिद्धी क्वचितच झाली असेल. विशेष म्हणजे पवारांनी वाड्यावरुन आल्यानंतर असे वक्तव्य केले होते त्यामुळे पवारांचे वक्तव्य हे “वाड्यावरचीच मसलत” असल्याचे कोल्हापूरात बोलले गेले. खरे खोटे स्वतः पवार व छत्रपतीच जाणोत !

राजे खासदार झाल्यानंतर काही दिवसांनी कोपर्डी येथे एक अमानुष घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ लाखोंच्या संख्येने मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र आला. याचवेळी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरु झाले. संभाजीराजे प्रथमच खासदार म्हणून संसद अधिवेशनास उपस्थित राहणार होते आणि या पहिल्याच अधिवेशनात कोपर्डीच्या घटनेविषयी संसदेत आवाज उठवून संभाजीराजेंनी आपल्या संसदीय कारकीर्दीस प्रारंभ केला. भाजपबरोबर जाऊन संभाजीराजेंनी मराठा समाजाचा विश्वासघात केला अशी टिकाही संभाजीराजेंवर झाली होती. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणारे संभाजीराजे हेच पहिले खासदार आहेत हि बाब लक्षात घेतली पाहिजे.

‘खासदार’ म्हणून संभाजीराजेंच्या प्रगतीचा आलेख हा चढताच आहे. संभाजीराजेंची संसदेतील उपस्थिती हि सर्वाधिक म्हणजेच १००% इतकी आहे. संभाजीराजेंनी वेगवेगळ्या विषयावरील एकूण १६६ हून अधिक प्रश्न संसदेत उपस्थित केले आहेत. याशिवाय कोल्हापूरातील इतर दोन खासदारांच्या तुलनेत संभाजीराजेंनी दत्तक घेतलेल्या ‘येळवण जुगाई’ या गावाची प्रगती वेगाने होत आहे.

‘छत्रपती’ म्हणून संभाजीराजेंना कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वीपासूनच मान सन्मान होता. पण २००९ च्या पराभवानंतर राजे जिल्ह्याच्या राजकारणातून स्वतःच बाजूला झाले होते. त्यांचे बंधू माजी आमदार मालोजीराजे हेदेखील सक्रीय राजकारणातून पूर्णतः बाजूला होऊन पुण्यातील शिक्षणसंस्थांचा कारभार सांभाळत आहेत. मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजे या कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते माजी मंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांचा प्रचंड जनसंपर्क व जनमान्यता आहे. त्यांच्या रुपाने छत्रपती घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात येणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत संभाजीराजेंनी रिंगणात उतरावे अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे. भविष्यात काय होईल हे येणारा काळच सांगेल. आतापर्यंतच्या तीन भागांमधून आपण संभाजीराजेंच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. संभाजीराजे हे राजघराण्याचे सदस्य आहेत, त्यातूनही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल सतत उत्सुकता असते. आपल्या राजेंचे दैनंदिन आयुष्य कसे असेल, राजेंचा स्वभाव कसा असेल इथंपासून ते राजघराण्याची संपत्ती किती असेल इथंपर्यंत जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्सुकता असते. संभाजीराजेंबद्दल या बाबींचाही आपण आढावा घेणार आहोत, पण या लेखमालेच्या पुढील भागात…..

हि लेखमाला आपल्याला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.

लेखमालेचे इतर भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ (भाग १)

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग दुसरा (मराठा आरक्षणाचा लढा)

One thought on “छत्रपती संभाजीराजे… ‘एक राजा माणूस’ (भाग ३)

Leave a comment