छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक ‘शिवाजी पूल’

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक ‘शिवाजी पूल’

२३ अॉक्टोबर १८७१ रोजी कोल्हापूरच्या राजगादीवर अभिषिक्त झालेले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना इतिहास ‘चौथे शिवाजी’ या नावाने ओळखतो, कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवर बसणारे ‘शिवाजी’ या नावाचे ते चौथे राजे होते.

चौथे शिवाजी महाराज यांची कारकिर्द सन १८७१ ते १८८३ अशी राहिली. महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर शहर व राज्यात काही नवीन व लोकोपयोगी बांधकामे करण्यात आली. कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल व पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पूल हा याच छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या काळात बांधण्यात आला.

श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज

वाहतूक व दळणवळणाच्या सोयीसाठी कोल्हापूर दरबारने पंचगंगा नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या बांधकामास सन १८७४ साली सुरूवात झाली. या कामावर आर्किटेक्ट म्हणून छत्रपतींच्या दरबाराने मेजर वॉल्टर डकेट यांची नेमणूक केली होती, तर बांधकामाचे कंत्राट ‘मेसर्स रामचंद्र महादेव अँड कंपनी’ यांना दिले होते. पूल बांधण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च हा छत्रपतींच्या दरबारातून करण्यात आलेला होता. सन १८७८ साली पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला झाला.

कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ, पुलाला ‘शिवाजी पूल’ असे नाव तेव्हाच देण्यात आले (छत्रपती शिवाजी महाराज पूल असे नव्हे !).

शिवाजी पूल बांधण्याचा निर्णय छत्रपतींच्या दरबारने घेतला, पूल बांधलाही दरबारने, पैसाही दरबारचाच वापरला. पण आज कित्येक लोक हा पूल इंग्रजांनी बांधला असे बेधडक ठोकून देतात. कोल्हापूरातील माध्यमांचे प्रतिनिधी देखील या पुलाचा उल्लेख ‘ब्रिटीशकालीन पूल’ असा करत याचे श्रेय ब्रिटिशांना देऊन मोकळे होतात. एखाद्या इमारतीच्या बांधकामाचा काळ सांगताना ती इमारत ज्या राज्यकर्त्यांच्या काळात बांधून झाली, त्यांच्या नावाने सांगितला जातो. कोल्हापूरचे राज्यकर्ते हे सन १९४९ पर्यंत छत्रपती महाराज होते, मग यात ब्रिटिश कुठून आले ? ते बांधकामासाठी पगारावर ठेवले म्हणून पूल लगेच ब्रिटिशकालीन होत नाही. अशात कुणी सांगत असेल की त्यावेळी देशभरात ब्रिटीशांची सत्ता होती, म्हणून पूल ब्रिटिशकालीन ! तर असेही होऊ शकत नाही, नाहीतर उद्या हेच लोक त्याकाळी देशभरात मुघलांची सत्ता होती म्हणून शिवरायांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंना मुघलकालीन वास्तू म्हणायला लागतील ! याबाबतीत कोल्हापूरकरांनी, माध्यम प्रतिनिधींनी गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. शेवटी आपला इतिहास हा आपल्यालाच जपावा लागणार आहे.

3 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कोल्हापूरचा ऐतिहासिक ‘शिवाजी पूल’

  1. Correct✅
    Asach ek same to same breej (pool) hirapoor tq. Georai,
    district. Beed pin-431127
    Yethe ahe tyacha itihaas pan asach ahe to kontya raje ni bandhala te te nahi sangta yenar pan he nakki sangtat ki britishanni bandhla.
    Tymulye tyachahi khara itihaas jantela mahiti karun dyawa hi namr vinanti.

    Like

Leave a comment