इतिहासप्रेमी छत्रपती 

श्रीमंत छत्रपति शहाजी महाराज म्हणजे छत्रपति शिवरायांचे दहावे वंशज व कोल्हापूर राज्याचे अकरावे अभिषिक्त छत्रपति होते. दि. ३१ मार्च १९४७ रोजी महाराजांचा ‘छत्रपति’ म्हणून राज्याभिषेक झाला व महाराजांनी “क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर श्रीमन्महाराज शहाजी छत्रपति” हि बिरुदावली धारण केली. महाराज गादीवर आल्यानंतर महाराजांनी कोल्हापूर राज्यात लोकशाही शासनव्यवस्था व कायदेमंडळ स्थापन केले. मात्र हा काळ खूपच धामधुमीचा होता. स्वतंत्र भारत सरकार व छत्रपति घराण्याचे पारंपारिक विरोधक टोकाचे राजकारणी डावपेच खेळून कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यासाठी छत्रपतिंवर प्रचंड दबाव निर्माण करीत होते. शहाजी महाराजांना छत्रपतिंच्या राज्याचे सौर्वभौमत्व गमवायचे नव्हते, म्हणून महाराणीसाहेबांना रीजंट नेमून स्वतः राजत्याग करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. पण महाराजांच्या या प्रयत्नांना यश आले नाही व दि. १ मार्च १९४९ रोजी महाराजांनी कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

हिज हायनेस मेजर जनरल क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज शहाजी छत्रपति हिंदूपद-पातशहा महाराज सरकार करवीर    

सन १९१० साली सार्वभौम सर्वसत्ताधीश असणाऱ्या छत्रपति महाराजांच्या राजवाड्यामध्ये शहाजी महाराजांचा जन्म झाला होता. महाराजांनी आपले अर्धे आयुष्य एक सर्वसत्ताधीश “राजा” म्हणून व्यतीत केले होते व आता महाराजांच्या हाती सत्तेची कोणतीही सूत्रे असणार नव्हती. आपण छत्रपति असताना आपल्याला छत्रपतिंचे राज्य टिकविता आले नाही, याचे महाराजांना वाईट वाटत असे. यानंतर महाराजांनी सार्वजनिक जीवनातील आपला वावर कमी केला व ते आपले छंद जोपासू लागले. शिकार व इतिहास अध्ययन हे महाराजांचे अत्यंत आवडीचे विषय. महाराज हे इतिहासाचे पदवीधर होते. इतकेच नव्हे, तर विश्वविद्यापीठातून शैक्षणिक पदवी मिळविणारे ते भारतातील पहिलेच राजपुत्र होते. कोल्हापूर राज्याच्या विलीनीकरणानंतर महाराजांनी शिकार व वन्यप्राण्यांच्या जोपासनेमध्ये रस घेतला. जसे वय वाढले तसे शिकार बंद करुन महाराजांनी इतिहास अध्ययन व संशोधनात अधिक लक्ष घातले. दाजीपूरच्या विस्तृत व निबिड पसरलेल्या जंगलात डोंगरांच्या कुशीत अगदी मध्यभागी महाराजांचे आजोबा म्हणजेच राजर्षी शाहू छत्रपति महाराजांनी ‘शिकार कँप’ म्हणून एक दगडी दुमजली बंगला बांधला होता. “शिवाजी व्हिला” त्याचे नाव ! शाहू महाराज व राजाराम महाराज शिकारीसाठी व धरण बांधकामाच्या पाहणीसाठी जेव्हा राधानगरीस येत तेव्हा ते याच बंगल्यावर उतरत असत. शिकार केलेले वन्यप्राणी इथेच आणले जायचे. या बंगल्याच्या भोवतालचे घनदाट जंगल म्हणजे छत्रपतींच्या स्वतःच्या मालकीची वन्यपशुसंपदाच होती. या जंगलात व शिवाजी व्हिला बंगल्यामध्ये वाघ व बिबट्यांसारख्या हिंस्त्र श्वापदांचा मुक्त वावर असायचा. शहाजी महाराजांचे पाळीव वाघ व बिबटे याच ठिकाणी अगदी मुक्तपणे वावरायचे. मानवी कोलाहलापासून कित्येक कोस दूर असणाऱ्या व जणू निसर्गदेवतेने आपला खजिनाच दडविलेला आहे, अशा या शिवाजी व्हिलामध्ये शहाजी महाराजांनी इतिहास संशोधनाचे कार्य सुरु केले. 

राजर्षि छत्रपति शाहू महाराजांनी राधानगरी येथे बांधलेला शिवाजी व्हिला. याच बंगल्यावर इतिहास संशोधनाचे कार्य वीस वर्षे अविरतपणे चालले. 

प्रसिद्ध इतिहास संशोधक मा. वि. गुजर व छत्रपति शहाजी महाराज याठिकाणी इतिहास संशोधन करीत असत. पुढे महाराजांचे तरुणपणीचे मित्र व तत्कालीन जागतिक ख्यातीचे इतिहास संशोधक कर्नल मनोहर माळगांवकर यांनादेखील शहाजी महाराजांनी मराठ्यांचा इतिहासावर संशोधन करण्यासाठी उद्युक्त केले. छत्रपति घराण्याचे खासगी दफ्तर होते, त्यामध्ये अगणित ऐतिहासिक दस्तऐवज होते मात्र तरीही मिळतील तिथून मूळ दस्तऐवज मिळविण्यासाठी महाराजांनी पगारी कर्मचारी नियुक्त केले होते. हि मूळ कागदपत्रे जमा करुन त्यांची व्यवस्थित छाननी करायची व त्यांचे संपादन करुन ती कागदपत्रे प्रकाशित करायची, म्हणजे नंतर कुणीतरी या कागदपत्रांच्या आधारे नव्याने इतिहास लिहू शकेल. या कार्यात अजूनही तज्ञ लोकांची गरज आहे असे महाराजांना वाटत असे, त्यामुळे कर्नल माळगांवकरांना महाराजांनी एखादा योग्य अभ्यासक शोधण्याची आज्ञा केली. माळगांवकरांनी खूप शोध घेऊन सदाशिव मार्तंड गर्गे नामक एका इतिहास अभ्यासकाला आणून महाराजांपुढे उभे केले. गर्गे यांनी करवीर राज्याच्या इतिहास संशोधनात खूपच आघाडी घेतली, पण छत्रपति घराण्यात एकच नावाचे तीन चार छत्रपति असल्याने व कोल्हापूर राज्यात एकाच नावाची अनेक गावे असल्याने संदर्भ जोडण्यात अनेक अडचणी येत होत्या. या अडचणी सोडविण्यासाठी या विषयातील जाणकार, येथील लोककथा व भुगोलाचा चांगला अभ्यास असणारा कुणीतरी हवा होता. शं.ह. वर्टीकर हे वयाची ऐंशी ओलांडलेले एकमेव गृहस्थ हे काम करु शकतील, असं महाराजांचं ठाम मत होतं. वर्टीकर हे पूर्वी कापशी जहागिरीचे दिवाण होते. आपले उर्वरीत आयुष्य देवधर्म करण्यात अथवा चकाट्या पिटण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. छत्रपतींच्या इतिहास मंडळात सामील होण्यात ते भलतेच उत्सुक होते. अफाट स्मरणशक्ती लाभलेले वर्टीकर म्हणजे कोल्हापूर राज्याचा चालता बोलता इतिहासच ! 

यानंतर महाराजांनी आपली गाडी पाठवून श्रीमंत खंडेराव गायकवाड व श्रीमंत रत्नाकरपंत राजाज्ञा या दोन जहागिरदारांना बोलावून घेतले. यांच्या कित्येक पिढ्यांनी शिवराय व ताराराणींच्या काळापासून छत्रपति घराण्याची सेवा केली होती. हे दोघेही मराठ्यांच्या इतिहासाचे जाणकार होते. अशा सहा इतिहास अभ्यासकांचे एक अनौपचारिक इतिहास मंडळच स्थापन झाले. पुढे महाराजांचे कारभारी व इतिहासप्रेमी यशवंतराव तस्ते हे ओघानेच या मंडळात सामील झाले. 

शिवाजी व्हिला येथील छायाचित्र. डावीकडून श्रीमंत खंडेराव गायकवाड, शं. ह. वर्टीकर, स. मा. गर्गे, छत्रपती शहाजी महाराज, दिनकर केरकर, कर्नल मनोहर माळगांवकर, श्रीमंत रत्नाकरपंत राजाज्ञा व यशवंतराव तस्ते.  

या मातब्बर इतिहास अभ्यासकांच्या एक दोन महिन्यांतून एकदा शिवाजी व्हिला येथे बैठका होऊ लागल्या. सात सदस्यांच्या या मंडळात बैठकांसाठी जनरल एस.पी.पी. थोरात, प्रसिद्ध चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर, राजपूत इतिहास संशोधक डॉ. रघुवीर सिंग, अमेरिकन विद्यापिठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. राव आणि इंग्लंडमधील विख्यात इतिहास संशोधक व मानववंशशास्त्रज्ञ डॉ. एड्रीन मेयर हेदेखील काही वेळेस येत असत. 
बंगल्यातील एका खोलीत बैठकीचे कामकाज चालत असे. या खोलीत खुर्च्या अजिबात नव्हत्या. महाराज व सर्व मंडळी भारतीय बैठकीत सतरंजीवर बसायचे. समोर ऐतिहासिक व अस्सल कागदपत्रे, ग्रंथ वगैरे साधने ठेऊन त्यांवर चर्चा व्हायच्या. या चर्चांमधून नवनवीन इतिहास समोर येऊ लागला. कोणत्याही प्रकारचा व अगदी अनपेक्षित इतिहास जरी समोर आला, तरी महाराज तो स्वीकारत असत. यशवंतराव तस्ते या चर्चांचा सविस्तर अहवाल तयार करीत असत. या चर्चांमधून व तस्तेंनी तयार केलेल्या अहवालांमधून मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक पैलू उघडले. इतिहास घडविलेल्या छत्रपतींच्या एका इतिहासप्रेमी वंशजाने स्थापन केलेल्या या इतिहास मंडळाने मराठ्यांच्या इतिहासावरील ऐतिहासिक कागदपत्रांचे एकूण तीस खंड संपादित केले व हे सगळेच्या सगळे महाराज छत्रपतिंनी स्वखर्चाने प्रकाशित केले. इतिहास लेखनास चालना मिळावी म्हणून या सर्व ग्रंथांच्या हजारो प्रती शहाजी महाराजांनी मोफत वाटल्या, तर काही प्रती ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर विकण्यात आल्या. महाराजांनी स्थापलेले हे इतिहास मंडळ तब्बल वीस वर्षे अखंड चालले. शेवटी महाराजांच्या मृत्यूनंतरच त्याचे कामकाज बंद झाले. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे राहिलेली संपत्ती चैनविलासात घालविणारे अनेक राजे तेव्हा होते, पण आपल्या पूर्वजांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी, आपला दैदिप्यमान इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या हातातील संपत्तीचा विनियोग करणारा राजा हा छत्रपतींच्या कुळातील असावा, हा योगायोग निश्चितच नव्हता. 

इतिहासप्रेमी माणसाला वाचनाची आवड नसेल तरच नवल ! महाराजांना इतिहास वाचनाची प्रचंड आवड होती. महाराजांच्या खासगी संग्रहात इतिहास, शिकार व युद्धकथा या विषयांवरील तेरा हजारहून अधिक ग्रंथ होते. दुर्मिळ ग्रंथ मिळेल त्या किंमतीत महाराज विकत घेत असत. जॉन फ्रियर याने लिहिलेल्या “न्यू अकाउंट अॉफ इस्ट अँड पर्शिया” या ग्रंथाची १६९२ साली प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती मिळविण्यासाठी महाराजांनी खूप पैसा खर्च केला होता. याचे कारण म्हणजे या ग्रंथामध्ये १६७४ साली रायगडावर झालेल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्ष सोहळ्यास उपस्थित असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांकडून लिहिलेले वर्णन होते. हा ग्रंथ मिळाल्यानंतर महाराजांनी आनंदोत्सव साजरा केला होता. महाराजांचे हे प्रयत्न सातत्याने चाळीस वर्षे अखंडपणे सुरु होते. छत्रपति शिवराय, शंभूछत्रपति, छत्रपति राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपति संभाजीराजे, महाराणी जिजाबाई यांनी लिहिलेली शेकडो ऐतिहासिक व अस्सल कागदपत्रे महाराजांनी मिळवून ती काचेच्या फ्रेममध्ये जतन करुन ठेवलेली आहेत.
महाराजांच्या झोपण्याच्या खोलीत नेहमी पाच सहा पुस्तके असायची. महाराज दररोज रात्री एक ते दोन वाजेपर्यंत पुस्तक वाचत बसायचे. काही वेळेस तर रात्रभर महाराज पुस्तकं वाचत बसायचे. प्रवासात नेहमी महाराजांसोबत इतिहास व शिकार या विषयांवरील पाच ते सहा पुस्तकं हमखास सोबत असायची. मराठ्यांच्या इतिहासातील हरएक बारकावे, तह, साल वगैरे सर्वकाही महाराजांना तोंडपाठ होते. महाराजांचे इतिहासप्रेम हे केवळ छत्रपति घराण्याच्या इतिहासापुरतेच मर्यादित नव्हते, तर स्वराज्याची सेवा करीत असताना ज्या घराण्यांतील वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा घराण्यांच्या इतिहासाची कागदपत्रे व त्यांच्या कैफीयती महाराजांनी स्वखर्चाने प्रकाशित करुन अनेक इतिहास अभ्यासकांना मोफत वाटल्या. 

छत्रपती शहाजी महाराजांनी स्वखर्चाने इतिहासग्रंथ छापून ते अनेक इतिहास अभ्यासकांना मोफत दिले, जेणेकरुन या संदर्भग्रंथांच्या आधारावर अभ्यासक करवीर राज्याचा इतिहास सर्वांसमोर आणतील. महाराजांच्याच प्रेरणेने आम्हीही करवीर रियासत फेसबुक पेजच्या माध्यमातून सदर छायाचित्रात दिसणारे ग्रंथ तरुण इतिहास अभ्यासकांना मोफत वाटले, पण दुर्दैवाने आम्हालाही तोच अनुभव आला जो त्याकाळी महाराजांनाही आला होता आणि तो म्हणजे, जे अभ्यासक ग्रंथ घेऊन गेले ते तिकडेच गायब झाले. करवीर राज्याचा इतिहास मांडण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. चूक त्यांची नाही, चूक आमचीच ! इतिहासातून आम्ही काही शिकलो नाही याची खंत वाटते. असो !

इतिहासप्रेमाबरोबरच महाराजांनी आपले अनेक छंद जोपासले होते. प्राणीप्रेम, फुटबॉल, क्रिकेट, पोलो हे त्यांपैकीच काही. हातून सत्ता जरी गेली असली, तरी आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजकल्याणकारी कामांचा वारसाही महाराजांनी जपला होता, या सर्व विषयांवरही स्वतंत्र लेख नक्कीच लिहू. तूर्त इतकेच !

इतिहासाच्या उद्धारासाठी स्वतःस वाहून घेतलेल्या या इतिहासपुरुषांना मानाचा मुजरा…!

हा लेख आपल्याला कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया जरुर नोंदवा.

पुढील लिंक ओपन करुन आमचे फेसबुक पेज लाईक करा. https://www.facebook.com/KarvirRiyasat

छत्रपतींचे प्राणीप्रेम : गजराज मोतीची शस्त्रक्रिया

( छत्रपती शाहू महाराजांच्या दोनशे हत्तींपैकी एक हत्ती. कोल्हापूरातील साठमारीचे ऐतिहासिक दुर्मिळ छायाचित्र. )

छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “मोतीगज” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.

दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.                                 “नाही” डॉक्टरांनी सांगितले.                       “दुसरा काही मार्ग?”

“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”                                                   “मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. 

दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,“उरलेल्या दाताला जिथून दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू.” महाराजांनी पिराजीच्या योजनेस संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले. लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती. शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन तयार केले. “गळसाज” असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली. लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी. अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !
अशाप्रकारे मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू लागला. त्यातूनही पिराजीने दाताला करवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, “पिराजी निघ बाहेर. मोती पायाखाली धरतोय तुला.” पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली. तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून बाहेर काढले. 

महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली. मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले. त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या. हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली. 

मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता. हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, “पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही.” तेव्हा पिराजी म्हणाला, ” बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल.” पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला.
#KarvirRiyasatFB 

Like us on facebook  

https://www.facebook.com/KarvirRiyasat/