छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग २ (मराठा आरक्षण लढा)

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत पराभवास सामोरे जावे लागल्यानंतरही खचून न जाता संभाजीराजे अधिक जोमाने काम करु लागले. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “२००९ च्या पराभवानंतर माझ्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर राजवाड्यात परतून ऐषोआरामाचे जीवन जगायचे किंवा जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायचे. मी दुसरा पर्याय निवडला.” निवडणूक निकालानंतर काहीच दिवसांत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होता. दरवर्षीप्रमाणे याही सोहळ्यास राजे उपस्थित राहिले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराभवानंतर संभाजीराजे कोल्हापूरातून बाहेर पडले व मराठा आरक्षणाबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

पण संभाजीराजे थेट राज्यपातळीवर जाणे हि त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणातून शोधलेली पळवाट आहे, असे काही बड्या राजकीय तज्ञांनी विश्लेषण केले. पण खरं सांगायचं तर संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांनी केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित राहणे हेच अयोग्य ठरले असते. राजेशाही संपुष्टात येऊन भारताने लोकशाहीचा जरी अंगिकार केला असला तरी सातारा व कोल्हापूर या दोन राजघराण्यांप्रती महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेले नितांत प्रेम, आदर व अपेक्षा तिळमात्रही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार न करता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी संभाजीराजे पुढे सरसावले हे त्यांच्या घराण्याच्या वारशास शोभणारेच पाऊल होते.

काही वर्षांपूर्वी बहुतांश मराठा समाजात आरक्षणाबद्दल प्रतिकूल मानसिकता होती. आम्ही उच्चकुलीन, सरदार – सरंजामदार जातीवंत मराठे आणि आम्ही आरक्षण घेऊन स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घ्यायचे का ? आरक्षणाच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही, अशी नकारात्मक लोकभावना मराठा समाजात रुजलेली होती. पण यामुळे समाजातील गरीब घटकांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात होत असलेले अतोनात नुकसान, कुचंबणा याकडे कुणाचेही लक्ष नव्हते अथवा प्रतिष्ठेपायी याकडे दुर्लक्ष केले जायचे. ज्या संघटना आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत होत्या त्यांच्यामध्येही एकी नव्हती. आरक्षणाच्या लढ्याला एकसंधपणा नव्हता. यावेळी संभाजीराजे छत्रपती या लढ्यात उतरले. मराठ्यांच्या सर्व संघटनांना त्यांनी एका छत्राखाली आणले. या संघटनांनी आरक्षण लढ्याचे नेतृत्व राजेंकडे सोपवले. संभाजीराजेंनी शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले व ठिकठिकाणी सभा घेऊन आरक्षणाबद्दल मराठा समाजात जनजागृती केली.

संभाजीराजेंच्या प्रत्येक सभेस हजारो लोकांची गर्दी उसळायची. “पूर्वी आपण मोठे सरंजामदार, जमीनदार होतो. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आपापसांत वाटण्या होऊन आज शंभर एकराचे शंभर तुकडे झालेले आहेत. समाजावर आर्थिक दारिद्रय ओढवलेले आहे. गुणवत्ता असूनही आपल्या मुलांना हवे ते शिक्षण मिळत नाही. मराठ्यांनो, हि परिस्थिती बदलायची असेल तर रम्य भूतकाळ विसरा आणि ओबीसींमध्ये स्वतःची गणना करा. अभिमानास थोडा धक्का बसेल पण आपल्या गरीब बांधवांना शिक्षणात फायदा होईल,” असे स्पष्ट शब्दांत प्रत्येक सभेत संभाजीराजेंनी ठणकावून सांगितले.

शाहू महाराजांनी मराठ्यांना दिलेल्या आरक्षणामुळे कोल्हापूर संस्थानात मराठ्यांची सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात झालेली उन्नती समजावून देत आरक्षणाचे महत्व व आज मराठा समाजास असलेली आरक्षणाची गरज समाजाच्या मनावर बिंबवली.

शिवशाहू रथयात्रेदरम्यान संभाजीराजेंच्या वाहनांचा ताफा…

शिवशाहू रथयात्रेच्या माध्यमातून आरक्षणाबद्दल समाजाचे मतपरिवर्तन घडवून आणून संभाजीराजेंनी ४ एप्रिल २०१३ रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे एक लाख मराठ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढला. यामध्ये ८४ हून अधिक मराठा संघटना सामील झाल्या होत्या व या मोर्चाचे सामूहिक नेतृत्व संभाजीराजेंकडे देण्यात आले होते.

गेल्या दोन-अडीचशे वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकदिलाने एकत्रित येण्याची हि पहिलीच वेळ होती, तेदेखील खुद्द छत्रपतींच्या नेतृत्वाखाली ! त्यामुळे “अशक्य ते शक्य कारण छत्रपतींचे नेतृत्व” असे या मोर्चाचे वर्णन सर्व स्तरांतून करण्यात आले.

मराठा समाजाची खरी ताकद व एकजूट दाखवून देण्यामध्ये संभाजीराजे यशस्वी झाले. या मोर्चामुळे राज्यसरकारला मराठा आरक्षणाविषयी गांभिर्याने विचार करणे भाग पडले व पुढच्याच वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केले.

मराठा समाजाच्या लढ्याला यश आल्याचे दिसू लागले पण ते केवळ एक मृगजळ ठरले. न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सत्तापालटही झाला. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार उदयास आले. यानंतर संभाजीराजेंच्या कारकीर्दीची दिशा काय राहिली हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत…

संभाजीराजेंच्या कारकिर्दीवरील या लेखमालेचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग पहिला

हा भाग आपणास कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. मराठा आरक्षण लढा – शिवशाहू रथयात्रेदरम्यानची आणखी काही क्षणचित्रे…

मुंबई येथील विशाल मराठा मोर्चाचे नेतृत्व करताना संभाजीराजे…

4 thoughts on “छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग २ (मराठा आरक्षण लढा)

  1. फक्त नाव व रक्ताचे नाही तर आचार अन् विचारानेही शिव-शाहू चे वारसदार आमचे राजे

    Liked by 1 person

  2. राजा तो राजा जो मावळ्यांना हक्का साठी आज पुन्हा लढण्यासाठी सज्ज राजा हा राज पणाने नाहीतर रायतेसाठी झिजण्या साठी असतो हे दाखवून दिलं राजे आपणाला मनाचा मुजरा

    Like

Leave a comment