छत्रपती संभाजीराजे… “एक राजा माणूस” (भाग १)

गेल्या आठ-दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. त्याचबरोबर अनेक युवा नेतृत्वांचाही उदय झाला. यामध्ये जनतेचे प्रचंड पाठबळ व लोकप्रियता लाभलेले नेतृत्व म्हणून कोल्हापूरचे युवराज व शिवरायांचे तेरावे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव ठळकपणे अधोरेखित होते. संभाजीराजेंच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. राजेंच्या लोकप्रियतेमागे व महाराष्ट्रातील तरुणांनी त्यांचे नेतृत्व उचलून धरण्यामागे, ते छत्रपतींचे वंशज आहेत हि सर्वांत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे सर्वप्रथम संभाजीराजेंच्या घराण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याचे त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या निधनानंतर विभाजन झाले व छत्रपतींच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती व सातारचे छत्रपती. या पैकी सातारची गादी दत्तक वारस नामंजूर करुन इंग्रजांनी इ.स. १८४८ साली खालसा केली व आपल्या साम्राज्यात सामील करुन घेतली. पण कोल्हापूरच्या छत्रपतींची गादी ब्रिटिशांना खालसा करता आली नाही. याच कोल्हापूर गादीचे संभाजीराजे हे वारसदार असून ते शिवरायांचे थेट तेरावे वंशज आहेत. ब्रिटिश काळातही कोल्हापूरचे छत्रपती स्वतंत्र राहिले. इतकेच नव्हे तर १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कोल्हापूरच्या छत्रपतींचे राज्य हे एक स्वतंत्र राज्य होते. पण इ. स. १९४९ साली छत्रपती शहाजी महाराज (राजर्षि शाहू महाराजांचे नातू व संभाजीराजेंचे आजोबा) यांनी कोल्हापूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन केले. विलीनीकरणानंतर छत्रपतींच्या हातून काही विशेष अधिकार वगळता संपूर्ण राजसत्ता निघून गेली. इतरांप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे सर्वसामान्य नागरिक झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक राजघराणी राजकारणात सक्रीय झाली. मात्र कोल्हापूरचे राजघराणे यास अपवाद ठरले. छत्रपती शहाजी महाराज हे राजकारणाऐवजी इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये उतरले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. अर्थातच जोडीला समाजकारण सुरुच होते पण ते राजकारणात मात्र सक्रीय झाले नाहीत.

राजर्षि शाहू महाराजांचे नातू व युवराज संभाजीराजेंचे आजोबा मेजर जनरल श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संसदेत जाणाऱ्या पहिल्या सदस्या म्हणजे राजमाता विजयमाला राणीसरकार. १९६७ साली भारताचे माजी उपलष्करप्रमुख जनरल एस. पी. पी. थोरात यांचा पराभव करुन विजयामाला राणीसरकार या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्यांच्यानंतर संभाजीराजेंचे वडील कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज हेदेखील समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही. त्यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे हे २००४ साली कोल्हापूर शहरातून वयाच्या २७ व्या वर्षीच आमदार म्हणून निवडून आले होते.

२००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर संभाजीराजे लोकसभा निवडणूकीस उभे राहिले, पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव संभाजीराजेंच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

या पराभवाचे विश्लेषण अनेक दृष्टिकोनांतून करता येईल पण त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वापार चालत आलेले पाडापाडीचे राजकारण. संभाजीराजे त्यावेळी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होती. असे झाले असते तर स्वतंत्र भारताच्या संसदीय व राजकीय इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना ठरली असती. संभाजीराजे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाच होता, पण असे घडणार नव्हते. किंबहुना संभाजीराजेंच्याच पक्षातील कोल्हापूर जिल्ह्याच्या ‘कारभाऱ्यांना’ तसे घडून द्यायचे नव्हते. कारण यामुळे छत्रपतींचे वारस म्हणून आधीच लोकप्रिय असलेल्या संभाजीराजेंचे राजकीय महत्त्व अनन्यसाधारण वाढून प्रस्थापित कारभाऱ्यांचे स्थान कायमचे डळमळीत झाले असते. छत्रपती राजकारणात आल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इतर नेत्यांची जी अवस्था झाली ती वेळ स्वतःवर येऊ नये यासाठी कोल्हापूरच्या नेत्यांनी कंबर कसली होती आणि याचे परिणाम म्हणजे संभाजीराजेंच्या विरोधात उभे ठाकले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक. पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या तरुण संभाजीराजेंसमोर अर्धी हयात राजकारणात घालवलेले मुरब्बी राजकारणी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे तगडे आव्हान उभे राहिले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. संभाजीराजेंचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मते हि जवळपास ४ लाख इतकी होती याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

२०१४ साली लोकसभा निवडणूक प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे ‘कारभारी’ असणाऱ्या तत्कालीन मंत्र्याने जाहीर सभेत संभाजीराजेंचा पराभव आपल्यामुळेच झाल्याची कबुली दिली होती.

यामुळे निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात असताना कोल्हापूरात मोठे रणकंदन माजले आणि याचाच धागा पकडत शिवसेनेने ‘ज्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजिर खुपसला त्यांना नेस्तनाबूत करुया’ असे आवाहन करत संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले. संभाजीराजेंनी ते निमंत्रण स्वीकारले नाही हा विषय वेगळा, पण या घडामोडींमुळे संभाजीराजे हे लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या छुप्या विरोधामुळेच पराभूत झाले या कोल्हापूरात चाललेल्या चर्चेस दुजोरा मिळून त्यावर शिक्कामोर्तब झाले.

संभाजीराजेंचा पराभव करुन कोल्हापूरातील नेत्यांनी स्वतःचे राजकीय स्थान जरी यशस्वीपणे शाबूत ठेवले तरी पहिल्याच प्रयत्नात आलेले अपयश हे संभाजीराजेंच्या यशाची पहिली पायरी ठरली, हेच पुढे घडलेल्या घटनांवरुन म्हणावे लागेल. राजेंच्या या पराभवानंतर पुढे कोणत्या घटना घडल्या व संभाजीराजेंच्या कारकीर्दीस कशी कलाटणी मिळाली हे पुढील भागात पाहूया….

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक ओपन करा…

छत्रपती संभाजीराजे… एक ‘राजा माणूस’ भाग दुसरा (मराठा आरक्षणाचा लढा)

4 thoughts on “छत्रपती संभाजीराजे… “एक राजा माणूस” (भाग १)

  1. उत्तम शब्द रचना आणि मांडणी. असेच लिखाण भविष्यात पण वाचायला आवडेल.

    Liked by 1 person

  2. एकच धुन ०६जुन…🚩🚩🚩
    #राजे मुजरा#
    @राजपथ@ दिल्ली.

    Like

  3. श्रीमंत संभाजीराजे छञपती यांच्या बद्दल खुप चांगली माहीत मिळाली

    Like

  4. महाराज मुजरा….
    अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजीराजे (महाराज) भोसले यांचे वंशज म्हणून आपण जे कार्य करत आहात ते खुपच अतुलनिय आहे….
    ६ जून २०१७ रोजी आपणांस रायगडावर पाहीले, मी धन्य झालो..रायगडासही पहील्यांदा आलो होतो….
    लहानपणापासून एक उर्मी अंगात होती, तिला चालना मिळाली व या शिवकार्यात वाहून गेलो. आपल्या भोसले घराण्याची जी ऐतिहासिक सुरुवात जिथून झाली त्या ‘देऊळगांव राजे’ चा रहिवासी असल्याचा अभिमान वाटतो.
    आपणांस ‘एकदा’ भेटावयाचे आहे, योग्य वेळ आल्यावर ते होइलचं….
    धन्यवाद….

    Like

Leave a comment